सातारा पालिकेसह सर्व विभागाच्या परवानग्या मिळताच रविवारी पहिली मोहिम यशस्वी
प्रतिनिधी/ सातारा
स्वराज्याची काही काळ राजधानी असलेली किल्ले अजिंक्यताऱयावर अनेक रहस्य दडलेली आहेत. या किल्याच्या संवर्धनासाठी अनेक शिवभक्त प्रयत्न करुन तेथील रहस्य उजेडात आणण्याचा प्रयत्न करत असतात. राजा शिवछत्रपती परिवाराच्यावतीने गेली आठ वर्ष महाराष्ट्रातीत तीस विविध गडावर दुर्ग संवर्धनाचे कार्य केले जात आहे. त्याच परिवाराच्यावतीने किल्ले अजिंक्यताऱयाच्या दक्षिण दरवाजाचा आणि पायऱयाचे संवर्धन करण्याचा विडा उचलला आहे. त्याची पहिली मोहिम रविवारी पार पडली. शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
सातारा जिह्यात सुमारे 25 हून अधिक गडकिल्ले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी काही दिवस मुक्काम केलेला किल्ले अजिंक्यताऱयाला विशेष महत्व आहे. त्यांचे नातू छ.शाहु महाराजांनी स्वराज्याची राजधानी सातारा केली होती. त्या गडावरुन अनेक मोहिमा आखत मराठा साम्राज्याचा विस्तार त्यांनी केला. त्याच किल्ले अजिंक्यताऱयाच्या संवर्धनासाठी वर्षभर कोणत्या ना कोणत्या संघटना कार्य करत असतात. किल्ले अजिंक्यताऱयावर अनेक रहस्य दडलेली आहेत. त्यातील काही मोजकी ठिकाणे व त्या ठिकाणाचे महत्व सातारकरांना ज्ञात आहे. राजा शिवछत्रपती परिवाराने गत दीड वर्षापूर्वी स्वच्छता मोहिम करताना जुनी लोखंडी पेटी आढळून आली होती. त्याच बरोबर चौथराही आढळून आला होता. हाच राजा शिवछत्रपती परिवाराच्यावतीने आठ वर्षे महाराष्ट्रातील तीस जिह्यातील विविध दुर्गांवर स्वच्छता आणि दुर्ग संवर्धनाचे शिवकार्य केले जात आहे. तसेच वर्धनगड, मल्हारगड आणि भूषणगड यांस लाकडी सागवानी महाद्वार बसवले आहे. आता सातारा नगरपालिकेच्या हद्दीत असणारा राजधानी किल्ले श्री अजिंक्यतारा वरील दक्षिण मुख्य महाद्वार आणि ढासळलेल्या पायऱया बसवण्याचे कार्य हे राजा शिवछत्रपती परिवारने छत्रपतींच्या आशीर्वादाने आणि सातारा नगरपालिकेच्या परवानगीने पुढील काही दिवसात हे अजिंक्यताराचे वैभव परत आणण्याचा निर्धार केला आहे. त्याची पहिली मोहिम रविवारी पार पडली. दक्षिण दरवाजातील पायऱयांची स्वच्छता करण्यात आली.
आराखडा तयार अन् परवानग्याही मिळाल्या
एखादे कार्य हाती घ्यायचे, मोहिम तडीस न्यायची तर त्याचे पुर्व नियोजन करावे लागते. त्यानुसार राजा शिवछत्रपती परिवाराच्यावतीने केलेल्या निर्धारानुसार एक आराखडा तयार करण्यात आला असून त्यास सातारा पालिकेसह पुरातत्व विभागानेही परवानग्या दिल्या असून त्यानंतरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे, असे परिवाराच्यावतीने सांगण्यात आले.
शिवभक्तांनी सहभागी व्हावे
गडकोट ही प्रेरणास्थान आहेत. प्रत्येकांनी आपल्या इतिहासातील खुणा जपण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. साताऱयातील किल्ले अजिंक्यताऱयाच्या दक्षिण महादरवाजाचे संवर्धनाचे कार्य सुरु असून सहभागी होवू इच्छिणाऱयांनी अधिक माहितीसाठी विशाल शिंदे 8329955783, अभिजित सुर्वे 9960410088 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राजा शिवछत्रपती परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.








