प्रतिनिधी / सातारा
किल्ले अजिक्यताऱ्यांवर आज सकाळी शिवभक्तांना दक्षिण दरवाजाच्या बाजूला महलाला लागून असलेल्या दाट झाडीत रंगीतसंगीत पार्टीचा अघोरी प्रथेचा प्रकार तेथे आढळून आलेल्या बकऱ्याच्या कातडीवरुन निदर्शनास आला. तसेच तेथे हळदीपुंकू लिंबू, शिजवलेला भात असे आढळून आल्याने शिवभक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ज्या किल्याच्या संवर्धनासाठी जिह्यातील हजारो शिवभक्त झटतात त्याच किल्यावर असला प्रकार होत असल्याचा खेद व्यक्त केला जावू लागला आहे. दरम्यान, अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देवून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
किल्ले अजिंक्यताऱ्यावर दररोज सकाळी साताऱ्यातील फिरायला जाणारे, दुपारी चुकारीचे आणि संध्याकाळीही फिरायला जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. किल्ले अजिंक्यताऱ्यावर आजही ऐतिहासिक वास्तूंचे अवशेष आढळून येतात. किल्याच्या संवर्धनासाठी अनेक दुर्गप्रेमी, शिवभक्त झटत आहेत. असे असताना काही विघ्नसंतोषी मंडळीकडून गडावर चुकीचे प्रकार करण्याचे काम सुरु असते. त्यातच काही दिवसांपूर्वी काही विघ्नसंतोषी मंडळींनी ऐतिहासिक चुन्याच्या घाण्याची मोडतोड केल्याचा प्रकार शिवभक्तांना माहिती पडल्यानंतर खेद व्यक्त केला. आज सकाळी काही शिवभक्त दक्षिण दरवाजाच्या बाजुने जात असताना तेथे असलेल्या महालालगतच्या दाट झाडीत पाहिले असता रात्रीच रंगीत, संगीत पार्टी झाल्याचे अवशेष आढळून आले. विटांची चुल होती. त्या चुलीतील विस्तव सकाळीही फुलत होता. विशेष म्हणजे झाडाला मृत बकऱ्याची कातडी टांगलेली दिसत होती. ठिकठिकाणी हळदकुंकू अन् शिजवलेला भात टाकल्याचा दिसत होता. त्यामुळे हा अघोरी प्रकार गडावर कोणी केला असेल?, गडावर रंगीतसंगीत पार्टी कोणी केली असेल ?, ज्या कोणी विघ्नसंतोषी मंडळींनी हा प्रकार केला त्याबद्दल साताऱ्यात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
वनविभागाने कठोर कारवाई करावी
सातारा जिल्हा हा क्रांतीकारकांचा जिल्हा आहे. पुरोगामी जिल्हा आहे. ज्या साताऱ्यातून अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ सुरु झाली. त्याच साताऱ्यात काळूबाईला बकर आणि कोंबड देवून काळी जादू करणीचे प्रकार केले जातात. तोच प्रकार आज साताऱ्यापासून जवळच असलेल्या किल्ले अजिंक्यताऱ्यावर बघायला मिळाला. पैर्णिमेच्या दिवशी कुठल्या तरी देवरुषीच्या सांगण्यावरुन एखाद्या बकऱ्याचा बळी देणं. आणि स्वतःवर करणी झालेली आहे. काळी जादू झालेली आहे असं समजून.असे घाणेरडे प्रकार केले जात आहेत. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली. अंनिसची अशी मागणी आहे की वनविभागाने त्वरीत कारवाई करावी. वनविभागाने जे कोणी या गडावर असे प्रकार करत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी अंनिसच्यावतीने प्रशांत पोतदार यांनी मागणी केली.









