प्रतिनिधी /बेळगाव
आग लागण्याचे सत्र काही केल्या थांबताना दिसत नाही. मंगळवारी किल्ला येथील खंदक तसेच बेळगुंदी येथे गवताला आग लागण्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचत आग आटोक्मयात आणण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही घटनांमध्ये किरकोळ प्रमाणात नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
मंगळवारी दुपारच्या सुमारास किल्ला येथील खंदकामध्ये टाकण्यात आलेल्या कचऱयाला अज्ञाताने आग लावली. प्रखर ऊन असल्यामुळे ही आग आजूबाजूला पसरत गेली. कचरा व गवताचे प्रमाण अधिक असल्यामुळे ही आग जुन्या भाजी मार्केटच्या गाळय़ांपर्यंत पोहोचली. गाळय़ांचे नुकसान होऊ नये, यासाठी वेळीच अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा फवारा मारत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. आग लागल्याचे समजताच या परिसरात बघ्यांची गर्दी वाढली होती.
बेळगुंदी गावानजीकच्या ग्लोबल एनर्जी परिसरात मंगळवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली. जंगल परिसरात लागलेल्या या आगीमध्ये बरेच नुकसान झाले. स्थानिकांनी अग्निशमन विभागाशी संपर्क साधताच त्यांनी घटनास्थळी पोहोचत लागलेली आग आटोक्मयात आणली. या आगीमध्ये बरीच झाडे जळून खाक झाली.









