ऑनलाईन टीम / पुणे :
कोरोनाच्या समस्येनंतर रामनदीच्या काठावरील विद्यार्थी जेव्हा शाळेत प्रवेश करतील तेव्हा त्यांना रामनदीच्या पुनरूज्जीवनाचा, स्वच्छतेचा संदेश भित्तीचित्रांव्दारे पहावयास मिळणार आहेत. किर्लोस्कर न्युमॅटिक्स कंपनी लि.च्या पुढाकारातून ‘रामनदी शाळा प्रकल्पा’ची सुरूवात, रामनदी पुनरूज्जीवन अभियाना अंतर्गत नुकतीच करण्यात आली आहे. नदी काठावरील सुमारे २५ शाळांमधून हा प्रकल्प पुढील ५ वर्षांसाठी राबविण्यात येणार आहे, अशी माहिती रामनदी पुनरूज्जीवन अभियानाचे वीरेंद्र चित्राव आणि अनिल गायकवाड यांनी कळवली आहे.
औंध, बाणेर, बावधन, पाषाण या परिसरातील पुणे महानगर पालिकेच्या १२ शाळांबरोबरच बालाजी मुरकुटे विद्यालय, मॉडर्न हायस्कूल, चेतन दत्ताजी गायकवाड, पेरिविंकल आदी सुमारे २० शाळांमधील ४० भिंती आकर्षकरित्या रंगविण्यात आल्या आहेत. भित्तिचित्रांच्या अर्ध्या भागात प्रदुषण, अतिक्रमण, सांडपाणी इत्यादी समस्यांनी वेढलेली रामनदी दाखविण्यात आली आहे. तर चित्राच्या उर्वरीत अर्ध्या भागात शाळातील मुले नदीची स्वच्छता करतांना, झाडे लावतांना, जलचरांना संरक्षण देतांना दिसतात.पुणे महानगर पालिकेच्या सहकार्याने आणि महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा नगरसेविका माधुरी सहस्त्रबुध्दे यांच्या पुढाकारातून हा प्रकल्प साकारण्यात आला आहे.
या प्रकल्पाविषयी महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा नगरसेविका माधुरी सहस्त्रबुध्दे म्हणाल्या की, ‘‘दुर्लक्षित रामनदीची ओळख नदीकाठच्या शाळांमधील मुलांना, शिक्षकांना झाली पाहिजे त्यातून प्रेरणा घेऊन नदी पुनरूज्जीवनासाठी त्यांना प्रवृत्त करणे यासाठी या भितींव्दारा प्रभावीपणे संदेश देण्याचा हा प्रयत्न आहे. मला खात्री आहे की, शाळेतील मुलांना रामनदीच्या स्वच्छतेचा मंत्र पटला तर ते कुटुंबातील अन्य सदस्यांना या कामात सहभागी करून घेतील.
या प्रकल्पाबद्दल किर्लोस्कर नुमॅटिक्सचे व्हाइस प्रेसिडेंट, जनरल मॅनेजर (हेल्थ आणि सी.एस.आर.) डॉ. सुरेश मिजार म्हणाले की, ‘‘गेली अनेक वर्षे आम्ही शालेय मुलांमध्ये पर्यावरण जागृतीचे काम करत आहोत. रामनदी काठच्या शालेय विद्यार्थ्यांना नदी, तिचे आरोग्य, पर्यावरण रक्षणाचे महत्व या प्रकल्पामधून सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे. नदी अस्वच्छच होणार नाही, यासाठी हे उद्याचे नागरिक जागृत असतील हा आम्हाला विश्वास आहे.
या ४० भिंतींवर प्रभावी चित्रांचे रेखाटन ‘क्राफ्टशिफ्ट इव्हेंट्स’चे दिपक शिंदे आणि त्यांच्या १० कलाकारांंनी केले आहे. भित्तीचित्रांचा हा प्रकल्प यशस्वी होण्यासाठी रामनदी पुनरूज्जीवन अभियानाचे वीरेंद्र चित्राव, अनिल गायकवाड, नयनीश देशपांडे, सुवर्णा भांबुरकर, अर्जुन नाटेकर यांनी विशेष प्रयत्न केले.