मुरगूड / वार्ताहर
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या सूचनेनुसार मुरगूड शहरात जर किरीट सोमय्या आले तर त्यांना विरोध करण्यासाठी कोणीही उपस्थित राहणार नाही. पण ज्या मार्गावरून ते येणार आहेत त्या मार्गावर मात्र काळे झेंडे लावून त्यांचा निषेध करण्यात येणार आहे अशी माहिती मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
२८ सप्टेंबरला किरीट सोमय्या मुरगूड मधील पोलीस स्टेशन मध्ये हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रार द्यायला येणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व तालुक्यासह जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या मनात तीव्र असंतोष आहे. यातूनच मुरगूडमध्ये त्यांना विरोध करण्यासाठी चक्क मुरगूड शहरात त्यांना ‘प्रवेश बंदी’चा ठराव नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत पारित करण्यात आला होता. तसेच येथील स्थानिक राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी ही शहर बंदीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती. आणि पुन्हा कोल्हापूर मध्ये सोमय्या याना विरोध होणार असे वातावरण तयार झाले होते.
पण खुद्द मंत्री मुश्रीफ यांनी आवाहन केल्यानुसार हा विरोध मावळल्याचे दिसले. मुश्रीफ यांनी आवाहन केल्यानंतर लगेच पालिका कार्यालयात पत्रकार परिषद घेत जमादार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, वास्तविक पाहता किरीट सोमय्या यांनी पर्यटनासारखे फिरत न बसता व चितावणीखोर भाष्य न करता यायला पाहिजे. जर दौऱ्यामध्ये ठरल्याप्रमाणे ते मुरगूडला आलेच तर त्यांना कोणीही नागरिक विरोध करण्यासाठी जाणार नाहीत. सर्व व्यवहार सुरळीत सुरू राहतील. शिवाय अत्यन्त शांततेने सोमय्या ज्या मार्गावरून पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहेत, त्या मार्गावर त्यानी केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध म्हणून काळे झेंडे लावले जातील.
यावेळी उपनगराध्यक्षा रंजना मंडलिक, नगरसेवक विशाल सूर्यवंशी, नगरसेवक रवी परीट, पक्षप्रतोद संदीप कलकूटकी, सचिन मेंडके, माजी नगराध्यक्ष प्रकाश चौगले आदी प्रमुख उपस्थित होते.
Previous Articleबनावट जमिन वाटप आदेशप्रकरणी बैठक घ्या
Next Article निगवे खालसातील ‘तो’ बेपत्ता तरुण सापडला मृतावस्थेत









