प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव विमानतळाच्या कम्युनिकेशन विभागाचे वरिष्ठ अधीक्षक किरण नारायण सुतार हे 37 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सोमवार दि. 30 रोजी निवृत्त झाले. या निमित्त बेळगाव विमानतळ प्राधिकरणाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
श्रीरामनगर, शिंदोळी येथील किरण सुतार हे 13 ऑगस्ट 1983 ला विमान प्राधिकरणाच्या सेवेत रूजू झाले. बेळगाव विमानतळाच्या विकासामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे, असे प्रास्ताविक करताना हेमलता यांनी सांगितले. यानंतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत किरण सुतार व त्यांच्या पत्नी विमल सुतार यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना राजेशकुमार मौर्य म्हणाले, किरण सुतार यांनी आपल्या कार्यकाळात उत्तम सेवा बजावली. त्यांनी त्यावेळी घेतलेल्या मेहनतीमुळे आज बेळगाव विमानतळाला देशात ओळख मिळाली आहे. याप्रमाणेच इतर कर्मचाऱयांनीही प्रामाणिक सेवा बजावावी, असे त्यांनी सांगितले.
यावेळी विमानतळाचे कम्युनिकेशन विभाग प्रमुख चंद्रशेखर, पी. एस. देसाई, उमापती, साळवी, पाच्छापुरे, मनोज मुतगेकर, इंडिगोचे व्यवस्थापक नागेश के. स्टार एअरच्या प्रमुख कोमल जानी, पाच्छापुरे, किरण सुतार यांचे चिरंजीव राहुल, प्रशांत व विकास, डॉ. मनोज सुतार यांसह मोठय़ा संख्येने विमानतळावरील कर्मचारी उपस्थित होते.









