संचालक-कर्मचाऱयांनी दिल्या ऑनलाईन शुभेच्छा : शांताई वृद्धाश्रम व गंगम्मा चिक्कुंबी मठात जीवनावश्यक साहित्याचे वाटप

प्रतिनिधी / बेळगाव
लोकमान्यचे समूहप्रमुख व चेअरमन किरण ठाकुर यांचा 69 वा वाढदिवस मोठय़ा उत्साहात संचालक व कर्मचाऱयांनी साजरा केला. संचालक व कर्मचाऱयांनी त्यांना ऑनलाईन शुभेच्छा दिल्या. तसेच सामाजिक हेतूने शांताई वृद्धाश्रम व गंगम्मा चिक्पुंबी मठ येथे अन्नधान्य व जीवनोपयोगी साहित्याचे वाटप केले.
किरण ठाकुर हे म्हापसा (गोवा) येथील प्रशासकीय कार्यालयात उपस्थित असल्याने त्यांना बेळगावमधून संचालकांनी आधुनिक पद्धतीने ऑनलाईन शुभेच्छा दिल्या. व्हा. चेअरमन डॉ. दामोदर वागळे, संचालक गजानन धामणेकर, सेवंतीलाल शाह, पंढरी परब, अजित गरगट्टी, प्रभाकर पाटकर, प्रा. अनिल चौधरी, विठ्ठल प्रभू, गायत्री काकतकर, सीईओ अभिजित दीक्षित, समन्वयक विनायक जाधव, निवृत्त कर्नल दीपक गुरुंग, सुनिल मुतगेकर, पीआरओ राजू नाईक यांच्यासह 213 शाखा व मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सावंतवाडी, रत्नागिरी, सांगली, म्हापसा व मडगाव या क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱयांनी शुभेच्छा दिल्या.
शांताई वृद्धाश्रमात वाढदिवस साजरा
शांताई वृद्धाश्रमातील वयोवृद्ध आजी-आजोबांसोबत किरण ठाकुर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. आजी-आजोबांना जेवण तसेच अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी बोलताना संचालक पंढरी परब यांनी किरण ठाकुर यांच्या कार्याचा गौरव करून लोकमान्यतर्फे राबविण्यात येणाऱया उपक्रमांची माहिती दिली. शांताईचे कार्याध्यक्ष विजय मोरे यांनी किरण ठाकुर यांचे अभिष्टचिंतन केले व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. आजी-आजोबांनी किरण ठाकुर यांना वाढदिवसानिमित्त आशीर्वाद दिले.
गंगम्मा चिक्कुंबी मठात साहित्याचे वाटप
सायंकाळी गंगम्मा चिक्कुंबी मठ येथे स्वयंपाकासाठी लागणाऱया साहित्याचे वाटप करण्यात आले. जेवण तयार करताना लागणारे गृहोपयोगी साहित्य देण्यात आले. गंगम्मा चिक्कुंबी मठातर्फे डॉ. मनीषा भांडणकर यांनी लोकमान्यच्या कार्याचे कौतुक करून किरण ठाकुर यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी संचालक, कर्मचारी उपस्थित होते.









