कांदोळकरांच्या पक्षविरोधी बोलण्यामुळे कार्यकर्तेही गोंधळले
प्रतिनिधी / म्हापसा
थिवीचे माजी आमदार किरण कांदोळकर हे आजही भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत. मात्र ते पक्षात असूनसुद्धा पक्षाविरोधात बोलत आहेत. काही आमदारांनाही भेटत आहेत. मी हळदोणचा आमदार आहे. श्री. कांदोळकर यांना निवडणूक लढवायची असल्यास प्रथम पक्षातून बाहेर पडावे त्यानंतरच पक्षाविरोधात बोलणे पसंत करावे. पक्षांतर्गत एकमेकात भेदभाव असतातच म्हणून कांदोळकरांनी नाहक पक्षाविरोधात काहीही बोलणे थांबवावे. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. आणि त्या पक्षाच्या आधारावरच कांदोळकर थिवीतून निवडून आले होते हे त्यांनी विसरू नये. त्यांच्या या पक्षविरोधी बोलण्यामुळे कार्यकर्तेही गोंधळून गेले आहेत. अशी माहिती हळदोणचे आमदार ग्लेन टिकलो सौजा यांनी म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. कांदोळकरांनी हळदोणातून निवडणूक लढविण्याचे स्वप्न पाहणे बंद करावे. शेवटी पक्ष आपल्या कार्याची दखल घेऊन येत्या निवडणुकीत आपल्यालाच तिकिट देणार आहे असेही ते म्हणाले.
म्हापसा भाजपा कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत यावेळी उत्तर गोवा अध्यक्ष महानंद अस्नोडकर, उपाध्यक्ष फ्रँकी कार्व्हालो, बस्तोडा सरपंच रणजीत उसगावकर, यावेळी व्यासपीठावर कार्यकारिणी सदस्य शिवानंद शिरोडकर, हळदोणा मंडळाध्यक्ष विनय चोपडेकर, बस्तोडा उपसरपंच मनिषा नाईक उपस्थित होते.
कांदोळकरांचे वैफल्यग्रस्तातून काहीही बोलणे
पुढे बोलताना आमदार टिकलो म्हणाले की, कांदोळकर स्वतः पक्ष काढण्याचा निर्णय घेतला आहे. आज देशात 600 हून अधिक छोटे मोठे पक्ष आहेत. असे पक्ष अळंबीसारखे येतात किती आणि जातातही. त्यांना खरोखरच निवडणूक लढवायची असेल तर त्यांनी प्रथम पक्ष सोडावा. भाजपचे कार्यकर्ते हे भाजपचेच आहेत. ते आपला पक्ष सोडून अन्यत्र कुठेही जाणार नाही. निवडणुकीसाठी अद्याप खूप वेळ आहे याची जाण कांदोळकरांनी ठेवावी असे टिकलो यांनी सांगितले. हळदोणा मतदारसंघातून कोणाला निवडून द्यावे हे जनता ठरविणार आहे-माजी आमदार किरण कांदोळकर हळदोणा मतदार संघातून निवडणूक लढविण्याच्या विचारात असेल. लोकशाहीत सर्वकाही शक्य आहे. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. ते कोणावरही सॉफ्ट कॉर्नर दाखवित नाही. आपण भाजपचा उपाध्यक्ष आहे. चांगल्या कार्यकर्त्यांना सर्वकाही कळते. थिवीच्या लोकांनी त्यांना नाकारल्याने ते वैफल्यग्रस्त बनले आहेत. आणि त्या वैफल्यग्रस्तातून कांदोळकर काहीही बोलत आहेत.
हळदोणातून आपल्यालाच तिकिट मिळणार
जिल्हा पंचायत निवडणुकीपासून कांदोळकर पक्षाविरोधात बोलत आहेत. असे असले तरी पक्ष त्यांच्यावर कारवाई का करीत नाही असा प्रश्न पत्रकारांनी टिकलो यांना केला असता ते म्हणाले, पक्ष प्रत्येकास संधीवर संधी देत असतात. त्यांच्या पक्षविरोधा कारवाईची मुख्यमंत्री ते कोरकमिटीला माहीत आहे. त्यांच्याबाबतचा निर्णय कोरकमिटी घेऊन पक्षश्रेष्ठींना पाठविणार आहे. संधीवर संधी देऊन पक्ष कांदोळकरांनाच हळदोणात तिकिट देणार नाही ना? असा प्रश्न आमदार टिकलो यांना पत्रकारांनी केला असता ते काहीवेळ गडबडले. येत्या निवडणुकीत पक्ष आपल्या कार्याची दखल घेऊन आपल्यालाच तिकिट देईल यात काहीच शंका नाही. याबाबत अधिक माहिती पाहिजे असल्यास पत्रकारांनी कांदोळकरांनाच जाब विचारावी असे त्यांनी सूचित केले.
पक्ष सोपेपणे कोणालाही काढत नाही.
यावेळी बोलताना उत्तर गोवा भाजपा अध्यक्ष महानंद अस्नोडकर म्हणाले की, पक्ष सोपेपणे कोणालाही काढत नाही. माजी आमदार किरण कांदोळकर यांनी पक्षासाठी खूप कार्य केलेले आहे. त्यांनी पक्षात रहावे की नाही हा त्यांचा निर्णय आहे. त्यांच्या मनात झाले की, त्यांनी सोडावे असे ते म्हणाले.
पक्षाचे उपाध्यक्ष फ्रँकी कार्व्हालो म्हणाले की, हळदोणा मतदारसंघातून ते कोणी आमदार बनण्याची स्वप्ने पाहत आहे ते त्यांनी बंद करावे. हळदोणातील नागरिक सर्वकाही बसून पाहत आहेत. काही कार्यकर्त्यांना जवळ करून आपण निवडणूक लढविणार असे सांगणे कांदोळकरांनी थांबवावे कारण येथील नागरिक खूप हुशार आणि योग्य निर्णय घेण्यास कटीबद्ध आहेत असे ते म्हणाले. यावेळी हळदोणा मंडळाध्यक्ष विनय चोपडेकर यांनी आपले विचार मांडले. उत्तर गोवा अध्यक्ष महानंद अस्नोडकर यांनी स्वागत केले.









