पोलीस अधिकारी असल्याचे सांगून टोलनाका पार केल्या प्रकरणी कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
सोने चोरी प्रकरणातील प्रमुख संशयित किरण विरनगौडरचे अनेक कारणामे उघडकीस येत आहेत. टोलनाका पार करण्यासाठी आपण पोलीस अधिकारी असल्याचे सांगत तो बनावट ओळखपत्र दाखवत होता, अशी धक्कादायक माहिती उघडकीस आल्यानंतर त्याच्या विरूध्द हिरेबागेवाडी पोलीस स्थानकातही एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
सीआयडीचे पोलीस उपअधिक्षक रामचंद्र बी. यांनी फिर्याद दिली आहे. भा.दं.वि. 465, 468, 471, 419 कलमान्वये सोमवारी दुपारी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 10 जानेवारी 2021 रोजी दुपारी 2.57 वाजता केए 63 एम 2993 क्रमांकाच्या आपल्या कारमधून बेळगावला येताना किरणने हिरेबागेवाडी जवळील टोलनाक्मयाजवळ पोलीस अधिकारी असल्याचे ओळखपत्र दाखविल्याची माहिती उघडकीस आली आहे.
पोलीस खात्यासंबंधीची बनावट ओळखपत्र तयार करुन घेवून टोलनाक्यावर पैसे न देता या महाभागाने सरकारला ठकविल्याच्या आरोपावरुन त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सोमवारी संकेश्वर व हिरेबागेवाडी या दोन पोलीस स्थानकात त्याच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. सीआयडीचे दोन स्वतंत्र पथके या प्रकरणाच्या तपासासाठी बेळगावात दाखल झाले आहेत.
सोने चोरी प्रकरणात मांडवली करण्यासाठी यमकनमर्डीला जाताना हिरेबागेवाडी टोलनाक्यावर प्रत्येकवेळी पोलीस दलासंबंधीची बनावट ओळखपत्रे दाखविली आहे. अधिकाऱयांनी या संबंधीचा तपाशील मिळविला असून सीसीटीव्ही फुटेजसह संपूर्ण तपशील तपास अधिकाऱयांकडे उपलब्ध झाला आहे. किरणच्या खासगी कार क्रमांकासमोर पोलीस असे टोलनाक्मयावर उल्लेख आढळून आला आहे.
चोरी प्रकरणात मांडवली करता करता हा महाभाग स्वतःही पोलीस अधिकारी असल्याच्या अविर्भावात वावरत होता. त्याला ओळखपत्र कोणी तयार करुन दिले. पोलीस अधिकाऱयांना या संबंधीची माहिती होती का? याचा तपशील मिळविण्याचे काम सीआयडीच्या अधिकाऱयांनी हाती घेतले आहे. बेळगाव येथील अनेक पोलीस अधिकारी किरणच्या सतत संपर्कात होते. त्यामुळे त्यांचीही चौकशी होणार आहे.
आतापर्यंत तीन एफआयआर
सोने चोरी प्रकरणाच्या तपासादरम्यान किरण व त्याच्या साथीदारांविरुध्द बेळगाव जिह्यात आतापर्यंत तीन एफआयआर दाखल झाले आहेत. सोने चोरी प्रकरणी यमकनमर्डी पोलीस स्थानकात सीआयडीच्या अधिकाऱयांनी फिर्याद दिली असली तरी त्या फिर्यादीत किरणच्या नावाचा उल्लेख नव्हता. सोमवारी संकेश्वर पोलीस स्थानकात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत व हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात टोलनाक्मयावर पोलीस असल्याची बनावट ओळखपत्र दाखविल्या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आले आहे.









