काही दुकाने सुरू : ग्राहकांचा अल्पप्रतिसाद मिळताच दुकाने बंद
प्रतिनिधी/ बेळगाव
वाढत्या कोरोना आणि ओमिक्रॉन रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मागील आठवडय़ापासून विकेंड कर्फ्यू जारी करण्यात आला आहे. त्यामुळे याकाळात बाजारपेठ थांबलेली पहायला मिळत आहे. शनिवारी बाजारपेठेत काही मोजकी दुकाने वगळता सर्व दुकाने बंद होती. त्यामुळे एरव्ही गजबजणारी बाजारपेठ विकेंड कर्फ्यूच्या दुसऱया आठवडय़ातदेखील शनिवारी शांत झाली.
बाजारपेठेतील मारुती गल्ली, गणपत गल्ली, खडेबाजार, किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, नरगुंदकर भावे चौक, काकतीवेस रोड आदी ठिकाणी काही दुकाने व किरकोळ वर्दळ वगळता शुकशुकाट होता. त्यामुळे विकेंड कर्फ्यूला काही प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. काही व्यापारी आणि विपेत्यांनी सकाळच्या सत्रात दुकाने खुली केली होती. मात्र ग्राहकांचा अल्पप्रतिसाद मिळताच दुकाने बंद केली. बाजारपेठेतील गणपत गल्ली कॉर्नर, खडेबाजार, खंजर गल्ली, कर्नाटक चौक आदी मार्गांवर बॅरिकेड्स लावण्यात आले होते. त्यामुळे वाहनधारकांना माघारी परतावे लागले. काही ठिकाणी चारचाकी वाहने आल्याने वाहतूक कोंडीदेखील झाली.

विकेंड कर्फ्यूकाळात बससेवा, मेडिकल, हॉस्पिटल, किराणा दुकान, भाजीपाला, मांस विक्री, दूध डेअऱया, रेशन दुकाने व इतर जीवनावश्यक गोष्टींना मुभा देण्यात आली होती. मात्र कर्फ्यूच्या धास्तीने नागरिकांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले. शिवाय शहराबाहेर मुख्य रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बाजारपेठेत जाणाऱया नागरिकांची अडवणूक करून चौकशीही केली जात होती.
बाजारपेठेतून मोठी उलाढाल होत असते. मात्र विकेंड कर्फ्यूच्या काळात दुकाने बंद राहत असल्याने आणि खरेदीदार नागरिकांनी पाठ फिरविल्याने उलाढालीवर मोठा परिणाम झाला आहे. शिवाय लहान विपेते, व्यावसायिक, हमाल, कष्टकऱयांना फटका बसला आहे.
शुक्रवारीच झाली होती गर्दी
विकेंड कर्फ्यूच्या धास्तीने बाजारपेठेत खरेदीसाठी शुक्रवारीच गर्दी झाली होती. याकाळात जीवनावश्यक गोष्टींना मुभा दिली असली तरी शनिवार-रविवार बाजारपेठ बंद राहणार, या भीतीने नागरिक शुक्रवारीच खरेदीला पसंती देत आहेत. शनिवार- रविवार बाजारपेठ बंद राहत असल्याने सोमवारी बाजारात प्रचंड गर्दी होत आहे. दोन दिवस थांबलेली बाजारपेठ पुन्हा सोमवारी गजबजत आहे.









