नवरात्रोत्सव काळात आकडेवारीच्या हिशेबाने दिलासाजनक वृत्त
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सणासुदीच्या काळाला सुरुवात होताच महागाईप्रकरणी मोदी सरकारसाठी मोठे दिलासाजनक वृत्त समोर आले आहे. ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात किरकोळ महागाई दरात मोठी घसरण नोंदली गेली आहे. सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाई दर कमी होत 4.45 टक्क्यांवर आला आहे. तर ऑगस्ट महिन्यात हा दर 5.3 टक्के राहिला होता. एप्रिल 2021 नंतरचा सर्वात कमी किरकोळ महागाई दर सप्टेंबर महिन्यात राहिला आहे.
सरकारकडून प्रसिद्ध आकडेवारीनुसार अन्नधान्याच्या किमती कमी झाल्याने किरकोळ महागाई दरात घट झाली आहे. आकडेवारीनुसार खाद्य महागाई दर सप्टेंबरमध्ये कमी होत 0.68 टक्के राहिला आहे. तर ऑगस्ट महिन्यात हा आकडा 3.11 टक्के होता. शासकीय आकडेवारीनुसार भाज्यांच्या किमतीत 22 टक्क्यांची घसरण झाली आहे. इंधन शेणीत महागाई दर 13.63 टक्क्यांवर राहिला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून 12 ऑक्टोबर रोजी सप्टेंबर महिन्यातील किरकोळ महागाई दराचे आकडे प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
रिझर्व्ह बँकेने स्वतःच्या नव्या पतधोरण आढाव्यात आर्थिक वर्षासघ्ठी स्वतःचा महागाई दराचा अनुमान 5.3 टक्के केला आहे. पूर्वी हा आकडा 5.7 टक्sक होता. यावेळचा महागाई दर रिझर्व्ह बँकेच्या लक्ष्यमर्यादेच्या आत आहे. यामुळे रिझर्व्ह बँकेलाही दिलासाजनक निर्णय घेता येणार आहेत. पतधोरण आढाव्याच्या समीक्षेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा भर महागाई कमी करण्यावर होता. यामुळे व्याजदरांमध्ये कुठलाच बदल करण्यात आलेला नाही. रेपो रेट पूर्वीप्रमाणेच 4 टक्के तर रिव्हर्स रेपो रेट 3.35 टक्के आहे. रिझव्हं बँकेने महागाई दरासाठी 4 टक्क्यांचे (2 टक्के अधिक किंवा 2 टक्के कमी) लक्ष्य निश्चित केले आहे.
आयआयपीत सुधारणा
ऑगस्टच्या इंडस्ट्रियल प्रॉडक्शनमध्ये (औद्योगिक उत्पादन) सुधारणा झाली आहे. आयआयपी ऑगस्टमध्ये वाढून 11.9 टक्के झाला आहे. तर जुलैमध्ये हा आकडा 11.5 टक्के होता. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात आयआयपी उणे 7.1 टक्के राहिला होता. ऑगस्टमध्ये निर्मिती क्षेत्राचे उत्पादन 9.7 टक्के राहिला होता. तर खाणक्षेत्रात 23.6 टक्के, तर विजनिर्मितीत 16 टक्क्यांची वाढ झाली.
जगभरात स्टॅगफ्लेशनची स्थिती
महागाईच्या आघाडीवर देशातील स्थिती चांगली दिसत आहे. पण जगभरात स्टॅगफ्लेशनयुक्त स्थिती निर्माण होण्याची चिंता वाढत आहे. स्टॅगफ्लेशनयुक्त स्थितीत आर्थिक विकास दर कमी पण महागाई दर अधिक राहतो असे जाणकाराने म्हटले आहे.









