वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रविवारी 21 दिवसांनंतर पेट्रोल आणि डिझेल दरवाढ थांबली होती. तथापि सोमवारी पुन्हा अल्प म्हणजे पेट्रोलमध्ये 5 पैसे तर डिझेलमध्ये 13 पैसे प्रतिलिटर दरवाढ करण्यात आली आहे. गेल्या तीन आठवडय़ामध्ये ही वाढ अनुक्रमे 9.17 रुपये आणि 11.13 रुपये इतकी झाली आहे.
या वाढीनंतर मुंबईमध्ये पेट्रोल 87.17 तर डिझेल 78.81 रुपये झाले आहे. सलग 21 दिवस वाढ झाली होती. ती रविवारी थांबली. परंतु ग्राहकांसाठी हा फक्त एकच दिवसांचा दिलासा ठरला आहे.
दरम्यान, या दरवाढीचा काँग्रेसने देशभर निषेध केला आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढवून सरकार सर्वसामान्यांची लूट करत असल्याचा आरोप केला आहे. सरकारने करांच्या नावाखाली 18 लाख कोटी रुपये उकळल्याचा आरोपही केला जात आहे.









