संशोधनानंतर वैज्ञानिकांचा दावा
जगात कोरोना महामारीचा प्रकोप कायम असतानाच इम्युनिटीवरून मोठी चर्चा सुरू आहे. कोरोना संसर्गातून बरे झाल्यावर किमान 8 महिन्यांपर्यंत विषाणूच्या विरोधात रोगप्रतिकारकक्षमता कायम राहत असल्याचा दावा एका नव्या संशोधनानंतर करण्यात आला आहे. नव्या संशोधनानुसार कोरोना संसर्गातून बरे झालेल्या लोकांमध्ये किमान 8 महिन्यांपर्यंत पुन्हा संक्रमणापासून बचावासाठी रोगप्रतिकारक क्षमता कायम राहते. कोविड-19 विरोधी लस दीर्घकाळापर्यंत प्रभावी राहण्याची अपेक्षा वाढविणारे हे संशोधन आहे. ऑस्ट्रेलियाच्या मोनाश विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानुसार प्रतिकारक प्रणालीच्या आत विशिष्ट पेशी असतात, ज्यांना मेमरी बी पेशी म्हटले जाते, याच पेशी विषाणूद्वारे झालेले संक्रमण लक्षात ठेवतात. विषाणू पुन्हा शरीरात शिरल्यास या पेशी वेगाने सुरक्षात्मक प्रतिरक्षा प्रणाली सक्रीय करत असल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.









