मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची मागणी
प्रतिनिधी/ पणजी
गोव्याला मोठय़ा प्रमाणात किनारपट्टी लाभलेली असून आम्हाला आता अधिक सुरक्षेची आवश्यकता आहे. कारण समुद्रमार्गे तस्करी तसेच गुन्हेगारी वाढण्याची शक्मयता गृहित धरून गोव्यात किनारी भागात गस्त वाढविणे तसेच फिरती फॉरेन्सिक लॅब तसेच किनारपट्टी सुरक्षा यंत्रणा उभारण्यासाठी केंद्राकडून आर्थिक मदतीची आवश्यकता आहे, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली गुजरात जवळ असलेल्या दीव येथे पश्चिम क्षेत्रीय राज्यांच्या मुख्यमंत्री तसेच अधिकाऱयांच्या बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. या बैठकीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने गेल्या आठ वर्षांत या देशाच्या विकासात जो कायापालट केला, त्याबद्दल पंतप्रधान व मंत्री अमित शहा यांचे अभिनंदन केले.
गोव्याच्या किनारपट्टीवर गस्त वाढविण्याची गरज!
मुख्यमंत्री डॉ. सावंत पुढे म्हणाले की, गोवा हे छोटेसे राज्य असले तरी या राज्याने खूप चांगली प्रगती आतापर्यंत केलेली आहे. गोवा हे पर्यटनासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरचे एक चांगले केंद्र बनले आहे. यामुळे साऱया जगाचे लक्ष गोव्याकडे असते, अशावेळी गोव्याला लाभलेल्या एकशे दहा किलोमीटरच्या समुद्रकिनारी पट्टीला धोका उद्भवण्याची शक्मयता आहे. तस्करी व तत्सम गुन्हे वाढू शकतात, यासाठी सातत्याने गोव्याच्या किनारपट्टीवर गस्त वाढविणे आवश्यक आहे. त्याचबरोबर फिरते फॉरेन्सिक लॅब शिवाय इतर अन्य यंत्रणा उभारण्यासाठी केंद्र सरकारने गोव्याला आर्थिक मदत करावी, अशी मागणी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी केली.
या बैठकीत गुजरात, महाराष्ट्र, गोवा तसेच दमण आणि दीव प्रशासकीय अधिकारी सहभागी झाले होते.









