प्रतिनिधी /रत्नागिरी :
अतिवृष्टीचा जोर गुरूवारी ओसरला असला तरी किनारपट्टीवर वाहणारा सोसाटय़ाचा वारा आणि समुद्राला आलेल्या उधाणाने अजस्त्र लाटांचे तांडव पहायला मिळत आहे. येथील मिऱया किनाऱयाची गेल्या 2 दिवसांपासून लाटांच्या तडाख्यांनी आणखीन वाताहात उडाली आहे. आता तर भगदाडे पडलेल्या बंधाऱयाच्या ठिकाणहून समुद्राचे पाणी थेट नागरिकांच्या घरापर्यंत धडक देऊ लागल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
अरबी समुद्राच्या मध्यपूर्व भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे समुद्राला प्रचंड उधाण आले आहे. वेगवान वारा व पावसाने किनारपट्टीला झोडपून काढले आहे. गुरूवारी जिल्हय़ाच्या किनारपट्टीवर जरी पावसाचा जोर काहीसा ओसरलेला दिसून आला. मात्र समुद्राला आलेल्या उधाणाची दहशत किनारपट्टी भागात दिसून येत आहे. मोठय़ा भरतीचा (हायटाईड) इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला होता. त्यामुळे बुधवारपासून दुपारनंतर आलेल्या भरतीवेळी समुद्रात सुमारे 4 ते 5 मीटर उंचीच्या अजस्त्र लाटा उसळत होत्या.
समुद्राला आलेल्या उधाणामुळे किनारपट्टीलगत राहणाऱया नागरिकांना प्रशासनाकडून सतर्क व खबरदारीच्या सूचना करण्यात आल्या आहेत. किनारी भागात वेगवान वारे घोंघावत आहेत. त्यामुळे किनारपट्टीवर लाटांचे तांडव पहायला मिळत आहे. रत्नागिरीच्या मिऱया किनाऱयावर उसळणाऱया प्रचंड लाटांचा तडाखा बसत आहे. उसळणाऱया लाटांनी तेथील धूपप्रतिबंधक बंधाऱयाची अगोदरच वाताहात उडवली आहे. गेल्या 2 दिवसांपासूनच्या उधाणामुळे त्या ठिकाणी आणखीनच नुकसानीत भर पडली आहे. बंधाऱयाला पडलेल्या भगदाडांमध्ये आणखीनच वाढ झाली आहे. त्यामुळे लाटांचे पाणी बंधारा ओलांडून थेट रहिवाशांच्या घरापर्यंत आता मजल मारू लागले आहे. त्यामुळे नागरिकांच्या ऊरात धडकी भरली आहे.
येथील पंढरामाड, जाकिमिऱया, परिसरात रहिवाशांच्या बागायतींचे नुकसान होऊ लागले आहे. प्रसाद उपळेकर यांच्या कंपाऊंडची चिरेबंदी भिंत लाटांच्या तडाख्यांनी फुटून गेली आहे. लगत राहणारे विकास पेडणेकर, बंडय़ा शेटय़े यांच्या बागायतीशेजारी असलेला बंधारा फुटल्याने आता लाटांनी बागायतींत शिरकाव केला आहे. उसळणाऱया लाटांच्या तडाख्याने बंधाऱयाचे दगड वाहून गेले आहेत. त्यामुळे लाटांच्या माऱयाचे पाणी घरापर्यंत पोहोचू लागलेले आहे. त्यामुळे किनारा संरक्षणासाठी असलेला धूपप्रतिबंधक बंधारा तातडीने मजबूत करावा, अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे.









