वार्ताहर/ किणये
मलप्रभा-मुंगेत्री परिसर बेळगाव, दक्षिण व पश्चिम विभाग किणये मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळय़ाला उत्साहात प्रारंभ झाला. बहाद्दरवाडी क्रॉस येथील प्राथमिक मराठी शाळेच्या पटांगणावर हा पारायण सोहळा सुरू असून यंदाचे हे 34 वे वर्ष आहे.
या पारायण सोहळय़ात काकड आरती, ग्रंथ वाचन, भजन, प्रवचन, कीर्तन निरुपण आदी कार्यक्रम सुरू आहेत. पहिल्या दिवशी ज्ञानेश्वर मूर्ती पूजन विवेक कदम यांनी केले. मारुती जाधव, विठ्ठल जागृत, हणमंत नाईक, भोमाणी पाटील, अनुराधा डुकरे, नारायण पाटील, सुरेखा मंडोळकर, कृष्णा पाटील आदींच्या हस्ते विविध देवदेवतांचे पूजन करण्यात आले.
ग्राम पंचायत सदस्य श्रीधर गुरव यांच्या हस्ते ध्वाजारोहण करण्यात आले. चंद्रकांत लोहार यांचे प्रवचन झाले. मारुती नाळकर यांचे कीर्तन निरुपण झाले.
टाळ-मृदंगाच्या गजरात व विठ्ठल नामाच्या जयघोषात सुरू असलेला हा पारायण सोहळा मोठय़ा उत्साहात व भक्तिमय वातावरणात चालू आहे. कडाक्याची थंडी असूनही प्रवचन, कीर्तन, जागर भजन व काकड आरतीला भाविकांची गर्दी वाढत आहे. येणाऱया प्रत्येक भाविकाचे थर्मल स्क्रिनिंग व सॅनिटायझर देऊनच मंडपात प्रवेश देण्यात येत आहे.
या पारायण सोहळ्यात 24 तास अखंड वीणा सेवा आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथवाचन करण्यासाठी येणाऱया प्रत्येक भक्ताला मंडळामार्फत ग्रंथ देण्यात येत आहे. बुधवारी रमाकांत उंडाळे यांचे प्रवचन असून वैजनाथ कांबळेकर यांचे कीर्तन होणार आहे.
गुरुवारी दयानंद काकडे यांचे प्रवचन व गजानन पाटील यांचे कीर्तन होणार आहे. शुक्रवारी डॉ. विश्वनाथ पाटील यांचे प्रवचन असून मारुती महाराज कसबा नंदगड यांचे कीर्तन होणार आहे. शनिवार दि. 16 रोजी या पारायण सोहळ्याची सांगता होणार आहे. ग्रंथवाचन झाल्यानंतर सकाळी 10 ते 12 या वेळेत सरवडे-राधानगरी येथील शिवाजीराव वागळेकर यांचे कालाकीर्तन होणार आहे. त्यानंतर मंडपाभोवती दिंडी प्रदक्षिणा होणार आहे. दुपारी दोननंतर आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. पारायण सोहळ्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे मंडळाचे अध्यक्ष ईश्वर कर्लेकर व सरचिटणीस तानाजी डुकरे यांनी कळविले आहे..









