वार्ताहर/ किणये
किणये येथील लक्ष्मी मंदिरात व नावगे क्रॉस, शिवाजी नगर येथील पंचमुखी हनुमान मंदिरात चोरी झाली आहे. एकाच दिवशी दोन मंदिरांमध्ये चोरी झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या चोरीच्या प्रकारांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
किणये गावातील जागृत ग्रामदेवता श्री लक्ष्मी मंदिरातील देवीच्या अंगावरील सोने व चांदीचे दागिने चोरटय़ानी लांबविले आहेत. सदर चोरीची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. हा चोरीचा प्रकार बुधवारी मध्यरात्री घडला असल्याची माहिती किणये ग्रामस्थांनी दिली आहे.
लक्ष्मी मंदिर गावच्या मध्यभागी आहे. बुधवारी रात्री सुमारे साडेबारा वाजेपर्यंत भजनी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भजनही म्हटले होते. त्यानंतर नेहमीप्रमाणे मंदिराचा दरवाजा बंद करून वारकरी मंडळी घरी निघून गेले. गुरुवारी सकाळी सहाच्या दरम्यान मंदिराचे पुजारी आनंत पाटील पूजा करण्यासाठी आले असता मंदिरात चोरी झाल्याचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. याबाबत त्यानी गावकऱयांना माहिती दिली. हा हा म्हणता मंदिर परिसरात गावकऱयांनी एकच गर्दी केली होती.
चोरटय़ांनी मंदिराच्या मुख्य दरवाजातून प्रवेश न करता मंदिराच्या स्लॅबवरून दुसऱया मजल्यावरील दरवाज्याची कडी तोडून मंदिरात प्रवेश करून चोरटय़ांनी ऐवज लांबविले असल्याची माहिती गावकऱयांनी दिली आहे.
जांबोटी रोड नावगे क्रॉस शिवाजीनगर येथील पंचमुखी हनुमान मंदिरामध्येही चोरी झाली आहे. गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास चोरी झाली असल्याचा संशय या भागातील नागरिकांतून व्यक्त होऊ लागला आहे. चोरटय़ांनी मंदिराच्या मुख्य दरवाज्याच्या सळय़ा तोडून आत प्रवेश केला व मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रक्कम लांबविली. किणये गावात गुरुवारी सकाळी वडगाव ग्रामीण पोलिसांनी जाऊन पाहणी केली आहे.









