तुकाराम बीज सप्ताहाला उत्साहात प्रारंभ : कोरोनाचे नियम पालन करत सप्ताह साजरा : आज कालाकीर्तन, दिंडी प्रदक्षिणा, महाप्रसादानंतर सोहळय़ाची सांगता
आण्णाप्पा पाटील / बहाद्दरवाडी
सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती
रखमाईच्या पती सोयरिया
गोड तुझे रुप, गोड तुझे नाम
देई मज प्रेम, सर्वकाळ।।
तुकाराम महाराजांच्या या अभंगाप्रमाणे तुकाराम महाराजांनी केवळ विठुरायांचेच गुणगान गायले आहे. विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होऊन त्यांनी समाजाला विठ्ठल भक्तीचा महिमा सांगितला. यामुळेच त्यांना वैकुंठगमन प्राप्त झाले. अशा या थोर संत शिरोमणी तुकाराम महाराज बीज सोहळय़ाला तालुक्मयाच्या विविध गावांमध्ये प्रारंभ झाला आहे.
संत साहित्य प्रवचन, कीर्तन आदींच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य झालेले आहे. तालुक्मयाच्या अनेक गावांमध्ये ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, तुकाराम गाथा पारायण, तसेच पांडुरंग सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. तुकाराम बीज सोहळाही काही गावांमध्ये साजरा करण्यात येतो. तुकाराम महाराजांवर त्यांच्या काळातील समाजाने सातत्याने अन्याय केला. तरीही त्यांनी आपले भजन, कीर्तन कार्य कधी थांबविले नाही. कारण अध्यात्माची गोडी जनमाणसात रुजविणे हे कार्य अगदी आपुलकीने केले पाहिजे. अनेक हालअपेष्टा सोसूनही त्यांनी सावळय़ा विठ्ठलाचे नामस्मरण केले. त्यांच्या तुकाराम गाथांमधील अभंग आजही प्रत्येक कार्यक्रमामध्ये गायिले जातात.
किणये येथील महालक्ष्मी मंदिरात मंगळवारपासून तुकाराम महाराज बीज सप्ताहाला भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली. शताब्दीकडे वाटचाल करीत असलेल्या या सप्ताहामध्ये वारकऱयांचा उत्साह अधिक प्रमाणात दिसून येत आहे. टाळ मृदंगाच्या गजरात, ‘बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम’ असा जयघोष करून किणये गावात तुकाराम बीज सोहळय़ाला प्रारंभ झाला.
किणये येथे फार वर्षापूर्वीपासून तुकाराम बीज सप्ताह साजरा करण्याची परंपरा आहे. या सप्ताहाला शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत. आजही हा सप्ताह मोठय़ा भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात येतो. यंदा कोरोना महामारीचे संकट असल्यामुळे प्रशासनाच्या नियमानुसार सप्ताह चालू आहे. गावातील काही प्रमुख पंचमंडळी व वारकऱयांनी या बीज सप्ताहाला सुरुवात केली. प्रारंभी अगदी 25 ते 50 लोकांचा सहभाग असायचा. हळुहळू त्यावेळेच्या वारकऱयांनी गावात या सप्ताहाचे महत्त्व पटवून दिले आणि त्यानंतर मात्र संपूर्ण गाव एकवटले आणि तुकाराम महाराजांच्या या नामस्मरणाच्या यज्ञात सहभागी होऊ लागले.
मंगळवारी पहाटे ‘उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा।’ असे भजन म्हणत काकडआरती झाली. प्रारंभी ज्ञानेश्वरी पारायण मंडळाचे सरचिटणीस तानाजी डुकरे यांच्या हस्ते महालक्ष्मी मूर्तीचे पूजन करण्यात आले. तुकाराम महाराजांच्या मूर्तीचे पूजन शिवाजी गावडू पाटील यांनी केले. विणा पूजन गोपाळ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तुळशीपूजन ग्रा. पं. सदस्या पूनम गुरव यांच्या हस्ते करण्यात आले.
हेचि दान देगा देवा। तुझा विसर न व्हावा।।
गुण गाईन आवडी । हेचि माझी सर्व जोडी।।
न लगे मुक्ति आणि संपदा। संतसंग देई सदा।।
तुका म्हणे गर्भवासी। सुखे घालावे आम्हासी।।
तुकाराम महाराजांच्या या अभंगाप्रमाणेच किणये गावातील वारकऱयांनी भगवंताकडे विठ्ठलाचे सतत नामस्मरण घडावे आणि तुझा विसर कधी न व्हावा, अशी मागणी केली आहे. किणये येथील तुकाराम बीज सप्ताहाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला आहे. अनेक तरुणांना अध्यात्माच्या प्रवाहात आणून त्यांना व्यसनापासून दूर करण्यात आले आहे, असे तानाजी डुकरे यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले. मंगळवारी दिवसभर मंदिरात भजनाचा कार्यक्रम झाला. रात्री 10 नंतर कर्ले येथील भारुडी भजनाचा कार्यक्रम झाला.
सप्ताहाची आज सांगता
बुधवारी या सप्ताहाची सांगता होणार आहे. बुधवारी पहाटे काकडआरती करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 10 वा. अनिल होसुरकर यांचे कालाकीर्तन होईल. त्यानंतर दिंडी प्रदक्षिणा करण्यात येणार आहे. भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांनी या सोहळय़ाचा लाभ घ्यावा, असे तुकाराम बीज सप्ताह कमिटी व ग्रामस्थांच्यावतीने कळविण्यात आले आहे.
तुकाराम महाराज गाथा मानवाला उर्जा देणारी : विलास पाटील

दोन दिवस आमच्या गावामध्ये या बीज सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. सर्व गावकरी गुण्यागोविंदाने या सोहळय़ाचा आनंद घेतात. तुकाराम महाराज यांची गाथा मानवाला नेहमी उर्जा देणारी व त्याला जगण्याचे सार्थ सांगणारी आहे. भगवंताचे सतत नामस्मरण करून भगवंत प्राप्तीचा मार्ग तुकाराम महाराजांनी दाखवून दिला आहे.
सप्ताहामुळे गावात अध्यात्माचा जागर : अनिल होसूरकर

तुकाराम महाराजांच्या अभंग, कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी भक्तीचा मार्ग दाखवून दिला आहे. गावात दोन दिवस होणाऱया तुकाराम बीज सप्ताह सोहळय़ामधून नामस्मरणाचे महत्त्व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचते. वाडवडिलांपासून ही परंपरा आम्ही कायम ठेवली आहे. या सप्ताहामुळे गावात अध्यात्माचा जागर तर होतोच याचबरोबर मुलाबाळांवर चांगले संस्कारही घडतात.
गावात वारकरी संप्रदायात वाढ : पुंडलिक दळवी

यंदा कोरोना महामारीमुळे सप्ताह साध्या पद्धतीने करीत आहोत. या सप्ताहामुळे गावात वारकरी संप्रदायामध्ये वाढ झालेली आहे. तुकाराम बीज सप्ताहाच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन किणये येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळय़ालाही सुरुवात करण्यात आली आहे. या ज्ञानेश्वरी पारायण सोहळय़ालाही 34 वर्षे पूर्ण झालेली आहेत. किणयेसह पंचक्रोशीतील भाविक तुकाराम बीज सप्ताहाला उपस्थित राहतात. प्रशासनाच्या नियमावलीचे पालन करून सप्ताह साजरा करीत आहोत.









