दोरी कापून केली जाते चोरी : गस्त वाढविण्याची गरज
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगावहून गोव्याला मालवाहतूक करणारे ट्रक लुटण्याचे प्रयत्न व प्रकार सुरूच आहेत. गुरुवारी मध्यरात्री कांदा, बटाटा व भाजीवाहू ट्रकची दोरी कापून लुटण्याचा प्रयत्न झाला आहे. या मार्गावर सशस्त्र टोळीची दहशत वाढली असून पोलिसांनी गस्त वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.
हातात विळा, कोयता घेऊन गुन्हेगार झुडुपात लपून बसलेले असतात. चढतीवर ट्रकचा वेग कमी झाला की दोरी कापून मिळेल त्या वस्तू चोरण्यात येतात. गुरुवारी मध्यरात्री ट्रक लुटण्याचा प्रयत्न झाला आहे. या घटनेनंतर संबंधितांनी तातडीने 112 या क्रमांकावर माहिती दिली. होय्सळ वाहनासह रात्रीच्या गस्तीवरील पोलीस घटनास्थळी दाखल झाले. किणये व कुसमळीजवळ वाहने लुटण्याचा प्रकार वाढले आहेत. कांदे-बटाटा, सायकल, किराणामाल, इलेक्ट्रिक साहित्य चोरल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत.
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण होण्याआधी सुतगट्टी घाटात मालवाहू ट्रकची दोरी कापून माल लुटण्याचे प्रकार घडत होते. चौपदरीकरणानंतर या घटना थांबल्या. बेळगाव पोलिसांना सुतगट्टी घाटात पोलीस चौकी उभारावी लागली होती. महामार्गावर सशस्त्र पोलिसांची गस्त वाढवावी लागली होती. आता बेळगाव -गोवा मार्गावर अशा घटना वाढल्या आहेत. या मार्गावरही गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.









