प्रतिनिधी / बेळगाव
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी काडा कार्यालयामध्ये किट वाटणार म्हणून काही जणांनी खोटय़ा बातम्या पसरविल्या. त्यामुळे वडगाव, शहापूरसह परिसरातील विणकर आणि इतर समाजातील नागरिकांनी व महिलांनी काडा कार्यालयासमोर सकाळी 7 वाजताच रांगा लावल्या. मात्र, याची पुसटशीही कल्पना खासदारांना नव्हती. दोन्ही बाजुला लांबच लांब रांगा लागल्याने एकच गोंधळ उडाला. तातडीने या घटनेची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांना देण्यात आली. त्यांनी सकाळी 11 वाजता दाखल होऊन उपस्थितांची समजूत काढली.
आम्ही अशा प्रकारे कोणतेच किट वाटणार नाही. तुम्हाला कोणी सांगितले? अस प्रतिप्रश्न केला. त्यावर आम्हाला काही जणांनी तोंडीच माहिती दिली. त्यामुळे सकाळी 7 वाजता आम्ही येथे आल्याचे उपस्थितांनी सांगितले. हातामध्ये आधारकार्ड, रेशनकार्ड घेऊन अनेक जण उपस्थित होते. मात्र, ही खोटी माहिती कोणी दिली? हे मात्र गुलदस्त्यातच राहिले आहे.
कित्तूर चन्नम्माच्या मुख्य रस्त्यावरच दोन्ही बाजुला लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कोरोनामुळे सुरक्षित अंतर पाळणे गरजेचे होते. मात्र, त्या नियमांना मुठमाती देऊन केवळ किटसाठी लागलेल्या रांगा पाहता साऱयांनाच आश्चर्य वाटले. प्रत्येक जण किट हवे आहे, एवढेच सांगत होते. मात्र कोण देणार हे कोणालाच माहिती नव्हते. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांना याबाबत विचारले असता मी अशा प्रकारे कोणालाची माहिती दिली नाही. मलादेखील याचेच आश्चर्य वाटत आहे. जाणूनबुजून कुणी तरी केलेले हे खोडसाळ कारस्थान आहे, असे त्यांनी सांगितले.
पोलिसांनी नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी रेल्वे राज्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱयांना याची माहिती दिली. ते बैठकीमध्ये होते. बैठकीनंतर येऊन त्यांनी संबंधितांच्या नावाची नोंद करून घेण्याचे आदेश दिले. मात्र, आता किट मिळणार की नाही? हे संभ्रमातच आहे. याच बरोबर वडगाव, शहापूर परिसरातच अशा प्रकारे अफवा पसरविण्यात आल्यामुळे वेगवेगळय़ा चर्चा सुरू होत्या.









