‘ब्लॅक बॉक्स’मुळेच उलगडणार ‘त्या’ घटनेचे रहस्य : अपघात स्थळावरून ब्लॅक बॉक्स हस्तगत
प्रतिनिधी /बेळगाव
तमिळनाडूतील कुन्नूर येथे बुधवार दि. 8 रोजी झालेल्या भीषण हेलिकॉप्टर दुर्घटनेत भारताचे सीडीएस जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्यासह 13 जण मृत्युमुखी पडले. त्यानंतर हा अपघात आहे, की घातपात याबाबत अनेक तर्क-वितर्क काढले जात आहेत. दरम्यान, अपघात स्थळावरून गुरुवारी हेलिकॉप्टरमधील ब्लॅक बॉक्स हस्तगत करण्यात आला. त्यामुळे या घटनेचे रहस्य लवकरच उलगडणार आहे. प्रत्येक विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्सची चर्चा होते. पण हा ब्लॅक बॉक्स म्हणजे काय, तो नेमका कसा असतो, त्याचं महत्त्व काय? हे आज आपण जाणून घेऊया.
हा बॉक्स नावाप्रमाणे काळा आहे का?
ब्लॅक बॉक्स, या नावावरून तुम्हाला वाटत असेल, की तो काळा आहे. तर ते चुकीचं आहे. कारण ब्लॅक बॉक्स हा काळा नसून तो नारिंगी रंगाचा असतो. अपघातामध्ये हा बॉक्स दुरूनच नजरेस पडू शकेल. या ब्लॅक बॉक्सवर आग किंवा पाण्याचा कोणताही परिणाम होत नाही. ब्लॅक बॉक्सची बॅटरी 30 दिवस टिकते. त्याच्या डेटाचा वापर अनेक वर्षांनंतरही करता येतो. ब्लॅक बॉक्स हा विमानाच्या मागील भागात बसवलेला असतो, कारण दुर्घटनेच्या परिस्थितीत हा भाग सर्वात सुरक्षित समजला जातो.
ब्लॅक बॉक्स कसा तयार केला जातो ?
ब्लॅक बॉक्स टायटॅनियमपासून तयार करतात. तयार होताना त्याला अनेक चाचण्यांमधून जावे लागते. ब्लॅक बॉक्स रेकॉर्डर 1110 अंश सेल्सीअस आगीत अनेक तास आणि 260 डिग्री सेल्सीअस तापमानात 10 तास राहू शकतो. इतकच नाही, तर मायनस 55 पासून प्लस 70 अंश सेल्सीअस तापमानातही हा बॉक्स काम करतो. सुरुवातीला विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळाल्यानंतर तपासणीसाठी तो प्रयोगशाळेत पाठवला जातो. यात रेकॉर्ड झालेल्या डेटाद्वारे विमान दुर्घटनेच्या कारणांची माहिती मिळते. मग हेलिकॉप्टर किंवा विमान या ब्लॅक बॉक्सप्रमाणे का बनवत नाहीत. कारण ब्लॅक बॉक्सचे काम असते डेटा सुरक्षित ठेवणे. तर हेलिकॉप्टरचे काम असते प्रवासी सुरक्षित ठेवणे. जर हेलिकॉप्टर
ब्लॅक बॉक्सप्रमाणे कठीण बनविले गेले, तर आतील प्रवासी सुरक्षित राहू शकणार नाहीत. उदाहरणार्थ हेल्मेट, हे फ्ढायबरपासून केले जाते. जेव्हा अपघात होतो, तेव्हा फ्ढायबर तो स्वतःवर झेलतो. त्यामुळे मनुष्याचे डोके सुरक्षित राहते.
ब्लॅक बॉक्सचा वापर प्रथम कोणत्या देशात करण्यात आला ?
विमानात ब्लॅक बॉक्स लावणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला देश होता. भारतात नागरी उड्डाण संचलनालयाने 1 जानेवारी 2005 पासून सर्व विमान आणि हेलिकॉप्टरमध्ये सीव्हीआर आणि एफडीआर लावणे अनिवार्य केले.
ब्लॅक बॉक्सचा शोध कोणी लावला?
ऑस्ट्रेलियाचे शास्त्रज्ञ डेव्हिड वॉरेन यांनी 1950 च्या दशकात ब्लॅक बॉक्सचा शोध लावला. ते मेलबर्नच्या वैमानिक संशोधन प्रयोगशाळेत काम करत होते. त्यावेळी कमर्शिअल एअरक्राफ्ट ’कॉमेट’चा अपघात झाला होता. या अपघाताचा तपास करणाऱया पथकात त्यांचा समोवश होता. विमान दुर्घटना होण्याआधीच्या घडामोडी रेकॉर्ड करता येईल का असा विचार करून त्यांनी फ्लाईट डेटा रेकॉर्डरवर काम करायला सुरुवात केली आणि त्यानंतर ब्लॅक बॉक्सचा शोध लागला.
ब्लॅक बॉक्स म्हणजे काय?
एखाद्या विमान अपघाताच्या कारणांचा शोध लावण्यासाठी दोन उपकरणे अतिशय महत्त्वाची असतात. एक म्हणजे विमानाचे फ्लाईट डेटा रेकॉर्डर (एफडीआर) आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्ड (सीव्हीआर), यालाच ब्लॅक बॉक्स असे म्हणतात. सीव्हीआरमध्ये अपघात होण्याच्या पूर्वीपासून दोन तासांचे रेकॉर्डिंग सुरक्षित ठेवले जाते. यात विमान किंवा हेलिकॉप्टरमधील संभाषण तसेच स्टाफ्ढबरोबर रेडिओ लहरींद्वारे केलेली बातचीत तर एफ्ढडीआरमध्ये इंधन प्रवाह, ईजीटी, फ्लाईट कंट्रोल, दबाव, इंधन अशा विविध प्रकारची 24 तासांहून अधिक वेळेची माहिती ठेवण्यात येते.









