अँटीबॉडी ठरतेय निष्प्रभावी : दीर्घकाळ रोगप्रतिकारकशक्ती कायम राहण्याची अपेक्षा धूसर
कोरोना संक्रमणातून बरे झालेले लोक पुन्हा या जागतिक महामारीच्या तावडीत सापडू शकतात. कोरोना विषाणूने संक्रमित झालेल्या व्यक्तीला संक्रमणापासून वाचविणाऱया अँटीबॉडी वेगाने कमी होत असल्याचा दावा ब्रिटिश संशोधकाने केला आहे. अँटीबॉडी कमी होत असल्याने कोविड-19 संक्रमणापासून दीर्घकाळापासून रोगप्रतिकारकशक्ती कायम राहण्याची अपेक्षाही संपुष्टात येत आहे.
काळासोबत अँटीबॉडीमध्ये घट

इम्पीरियल कॉलेज, लंडनच्या एका अध्ययनाच्या अंतर्गत इंग्लंडमध्ये 3,65,000 हून अधिक लोकांची चाचणी करण्यात आली. कोविड-19 साठी जबाबदार कोरोना विषाणूपासून रक्षण करणाऱया अँटीबॉडी वेळेसोबत कमी होत आहेत असे अध्ययनात आढळून आले आहे. रोगप्रतिकारकशक्ती केवळ काही महिन्यांपुरतीच राहू शकते, असे यातून संकेत मिळत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
वयानुसार प्रभाव
काळासोबत अँटीबॉडी असलेल्या लोकांच्या संख्येत घट दिसून आल्याचे अध्ययनातून स्पष्ट होते. अँटीबॉडी कमी होण्याची प्रकरणे तरुणांच्या तुलनेत 75 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये अधिक आढळली आहेत अशी माहिती इम्पीरियल कॉलेज लंडनमधील संचालक पॉल इलियॉट यांनी दिली आहे. या संशोधनामुळे पूडील रणनीति ठरविता येणार आहे.
ब्लड प्लाझ्माचा प्रभाव
वैज्ञानिकांनी कोरोना संक्रमणातून बरे झालेल्या लोकांच्या शरीरातून प्राप्त करण्यात आलेल्या ब्लड प्लाझ्माच्या प्रभावीपणाचा कालावधी शोधून काढला आहे. संक्रमणातून बरे झालेल्या लोकांच्या रक्तातून प्राप्त ब्लड प्लाझ्माचा प्रभावीपणा केवळ 3 महिन्यांपुरती राहतो, याच्यानंतर एखाद्या बाधिताला याचा डोस देण्यात आला तर त्याचा कुठलाच प्रभाव होणार नाही, असे कॅनडाच्या क्यूबेकच्या संशोधन पथकाने म्हटले आहे. संशोधकांनी याकरता कोरोनातून बरे झालेल्या लोकांच्या एका गटातून प्लाझ्मा मिळविला होता. ज्यानंतर 6 महिन्यांनी त्यांच्या रक्तातील अँटीबॉडी संपुष्टात आल्याचे त्यांना आढळून आले आहे.
6-12 महिन्यांनी पुन्हा धोका

दरवेळी हिवाळय़ात लोकांना संक्रमित करणारा कोरोना विषाणू 6-12 महिन्यांनी पुन्हा लोकांना संक्रमित करू शकतो असे उद्गार संशोधकांमध्ये सामील प्राध्यापक वेंडी बार्कले यांनी काढले आहेत. कोविड-19 संक्रमणासाठी जबाबदार विषाणूपासून संक्रमित झाल्यावरही शरीर अशाचप्रकारे प्रतिक्रिया देत असल्याचे ते म्हणाले.









