पूरपरिस्थितीचा बससेवेवर परिणाम उत्पन्नातही घट
प्रतिनिधी /बेळगाव
अनलॉकनंतर जिल्हय़ांतर्गत व राज्यांतर्गत बससेवेला प्रारंभ झाला आहे. हळूहळू बससेवेला प्रतिसाद वाढत असतानाच जोरदार पावसाने धुमाकूळ घातल्याने बससेवा पुन्हा एकदा विस्कळीत झाली. त्यामुळे बेळगाव विभागाला साधारण दिवसाकाठी 15 लाख रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे.
गुरुवारी व शुक्रवारी जोरदार पाऊस झाल्याने स्थानिक आणि लांब पल्ल्याच्या बससेवेवर परिणाम झाला होता. मात्र शनिवारपासून पावसाने उसंत घेतल्याने सर्व प्रकारची बससेवा पूर्ववत सुरू झाली. मात्र अद्यापही काही रस्त्यांवर पाणी असल्याने त्या भागातील बससेवा ठप्प आहे. मांजरी पुलावर पाणी आल्याने बेळगाव-विजापूर बससेवा याबरोबरच शिरसी, यल्लापूर, कारवार, गोकाक, बिडी, इटगी आदी भागातील बससेवा बंद आहे. दरम्यान महाराष्ट्रातदेखील मोठय़ा प्रमाणात पाऊस झाल्याने ठिकठिकाणी रस्ते आणि पुलावर पाणी आहे. शिवाय पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरदेखील पाणी साचून असल्याने कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा ठप्प झाली आहे. तसेच लॉकडाऊनपासून कोकणातील बससेवादेखील बंदच आहे.
पाणी असलेल्या रस्त्यांवर अद्याप बससेवा ठप्पच
दोन दिवसांपूर्वी झालेल्या संततधार पावसामुळे जिल्हय़ातील अनेक रस्त्यांवर पावसाचे पाणी आले आहे. पावसाने उसंत घेतली असली तरी अद्यापही बऱयाच रस्त्यांवरील पाणी ओसरले नाही. त्यामुळे बससेवा ठप्पच आहे.
वातानुकूलित बससेवा सुरू
स्थानिक आणि लांब पल्ल्याच्या बससेवेबरोबरच वातानुकूलित बससेवा सुरळीत सुरू झाली आहे. बेंगळूर, चेन्नई, तिरुपती, हैदराबाद आदी ठिकाणी रात्रीच्या प्रवासासाठी वातानुकूलित बस धावत आहेत. यासाठी बसस्थानकात आगाऊ बुकिंग करण्यात येत आहे.









