पुराचे पाणी ओसरले, अनेकांचे संसार उद्ध्वस्थ, कोटय़वधीचे नुकसान
प्रतिनिधी/ पणजी
गेल्या काही दिवसांपासून राज्याला पावसाने झेडपून काढले, धरणांचे पाणी सोडल्यामुळे शुक्रवारी रात्री पेडणेपासून ते काणकोणपर्यंत सर्वच नद्यांना पूर आला. शुक्रवारी झालेल्या जलप्रलयामुळे काही घरे जमीनदोस्त झाली. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. मोठय़ाप्रमाणात शेती-बागायती वाहून गेल्या. शेतकऱयांचा हात पुन्हा डोक्यावर आला. कोटय़वधी रुपयांच्या नुकसानीला सामोरे जावे लागले. एका महिलेचा मृत्यू झाला. शनिवारी पावसाने थोडी उसंत घेतल्यामुळे घरात, शेती बागायतीत भरलेले पाणी ओसरू लागले आहे. पूरग्रस्त लोक डोळ्यातील पाणी पुसत जे काय शिल्लक राहिले आहे ते गोळा करत आहेत. शनिवारी सकाळी मुख्यमंत्र्यांसह अनेक आमदार, मंत्र्यांनी विविध ठिकाणी भेटी देऊन एकंदरित परिस्थितीचा आढावा घेतला.
शेती-बागायतीचे नुकसान
राज्यातील सुमारे हजारो घरांना नुकसान पोहोचलेले आहे. काही घरे कोसळलेली आहेत. काही ठिकाणी मातीची घरे असून त्यात पुराचे पाणी भरून राहिल्यामुळे घराच्या भिंती फुगल्या असल्याने ती धोकादायक बनली आहेत. अनेक घरातील कपडे, अन्नधान्य दागदागिने तसेच इतर महत्त्वाच्या वस्तू पाण्यात वाहून गेल्या आहेत. घरातील मुलांच्या शाळेतील वह्या पुस्तकेही पाण्यात वाहून गेली आहेत. 800 हेक्टर्सहून अधिक शेत जमिनीतील शेती बागायती वाहून गेली आहे.
500 कोटीहून अधिक नुकसान ः मुख्यमंत्री
राज्यात आलेल्या पुरामुळे 500 कोटीहून अधिक नुकसान झाल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी शनिवारी सकाळपासून धारबांदोडा मतदारसंघत तसेच अन्य काही ठिकाणी पाहणी केली. पूरग्रस्तांना सहकार्य केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
तौक्ते वादळातील नुकसानापेक्षा मोठे नुकसान
तौक्त वादळात झालेल्या नुकसानीपेक्षाही या पुरामुळे झालेले नुकसान फार मोठे आहे. ज्या लोकांना अन्न आणि निवारा देण्याची गरज आहे. त्यांना मदत करायला सुरुवात केली आहे. किमान 15 दिवस पुरणार इतके अन्नधान्य त्यांना द्यावे, असे उपजिल्हाधिकाऱयांना बजावले आहे. तसेच ज्यांच्या घरात पुराचे पाणी साचून संपूर्ण घर चिखलमय झाले त्यांना अग्निशामक दलातर्फे मदत द्या, असेही बजाविले आहे. ज्या लोकांना नुकसानभरपाई देण्याची गरज आहे त्यांना येत्या 15 दिवसांच्या आत सोपस्कार पूर्ण करून नुकसानभरपाई देण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी घेतला दूरध्वनीवरून आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यातील पूर, हानी व नुकसानीची दखल घेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी संपर्क साधून राज्यातील परिस्थितीची विचारपूस केली तसेच सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. डॉ. सावंत यांनी त्यांना पुराची सर्व माहिती कथन केली आणि केंद्राकडून मदतीची मागणी केल्याचे सांगण्यात आले.
गृहमंत्री शहा यांच्याशीही संपर्क
डॉ. सावंत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी संपर्क साधून त्यांना गोव्यातील पुराची थोडक्यात माहिती दिली व पुरग्रस्तांसाठी मदत मागितली. दरम्यान, भाजप गोवा प्रदेशतर्फे पुरग्रस्तांसाठी केंद्र सरकारकडे मदतीची याचना करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी दिली आहे. पक्षातर्फे या पुरग्रस्तांसाठी लवकरच हेल्पलाईन सुरू करण्यात येणार असून गरजूंनी तेथे संपर्क साधून मदतीची मागणी केल्यानंतर त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
गोव्यातील या पुराच्या संकटकाळात केंद्रसरकारने मदतीचा हात द्यावा. ती मदत मिळेल अशी खात्री श्री. तानावडे यांनी वर्तवली. डॉ. सावंत यांनी तातडीने पुरग्रस्त गावांना भेट देऊन पुरग्रस्तांना दिलासा दिला म्हणून श्री. तानावडे यांनी डॉ. सावंत यांचे कौतुक केले.
पैकुळ पूल उभारणार
सत्तरीतील पैकुळ गावातील पैकुळ पूल पुरामुळे कोसळला असल्याने गावातील सुमारे 800 लोकांचा इतर गावाशी संपर्क तुटला आहे, या लोकांना तात्पुरता लाकडी पूल उभारुन देण्यात आला आहे, लवकरच नवा पूल बांधण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
अग्निशामक दलाची चांगली कामगिरी
पुरामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत अग्निशामक दलाच्या जवानांनी चोख कामगिरी बजाविली असून अनेक ठिकाणी अडकून पडलेल्या 158 लोकांना सुरक्षित जाग्यावर नेण्याचे काम केले आहे. विविध ठिकाणी रस्त्यावर झाडे कोसळली तसेच दरडीही कोसळल्या. अवघ्या काही वेळांत रस्ते मोकळे करण्याचे कामही अग्निशामक दलाने उत्कृष्टरित्या केले. पाडेली येथील 24 लोक पुराच्या पाण्यात अडकले होते त्यांना अग्निशामक दलाच्या जवानानी जीवनदान दिले आहे. फोंडा तालुक्यातील प्रियोळ गावातील 11 लोकांचा पुराच्या पाण्यापासून बचाव केला आहे. केरी येथील 10 लोकांना तर धारबांदोडा तालुक्यातील 4 लोकांना सुरक्षितस्थळी हलविले.
फोंडा, पणजीसह विविध भागात पाणीपुरवठय़ात अडथळा
ओपा पाणी प्रकल्पातील यंत्रणा पुरामुळे निकामी झाली असून त्याचा परिणाम होऊन फोंडा, पणजी शहरांसह विविध मतदारसंघांत पाणीपुरवठा करणे अडचणीचे झाले आहे. फोंडा, शिरोडा, मडकई, प्रियोळ, कुंभारजुवे या मतदारसंघांत पाणी मर्यादित स्वरुपात मिळणार असून पणजी, ताळगाव, सांतआंद्रे, सांताप्रुझ या मतदारसंघांतही पाणी मर्यादितच दिले जाणार आहे. ओपा प्रकल्पातील अनेक मोटर्स बंद पडल्या असून त्यामुळे पाणी खेचणे अशक्य झाले आहे. दोनच मोटर्स चालू असून त्याद्वारे शक्य तेवढे पाणी देण्याचा प्रयत्न चालू आहे.
पावसाने विश्रांती घेतल्याने दिलासा
पावसाने विश्रांती घेतल्यामुळे गोव्यातील जनतेला तसेच पुरग्रस्तांना दिलासा मिळाला असून पुराच्या संकटातून राज्यातील परिस्थिती हळूहळू निवळत आहे, सावरत आहे. तरी देखील पुराने अनेक लोकांना निराधार केले असून ते आता उघडय़ावर पडले आहेत. काहीजणांनी निवारा केंद्रात आसरा घेतला असून अनेकांनी सगे – सोयऱयांकडे आश्रयाला गेले आहेत. कोरोनामुळे संकटात सापडलेल्या अनेकांवर हे पुराचे दुसरे संकट कोसळले आहे. त्यातून झळ बसलेले लोक कसे सावरणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.








