प्रतिनिधी / कास
जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठाराच्या निसर्गरम्य परिसरात आज सकाळी अज्ञात व्यक्तीने गाडीभर औषधांच्या बाटल्या, गोळ्यांची पाकिटे व ईतर जैविक कचरा आणून जाळल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले. सातारा कास रस्त्यावर पारांबे फाटा येथून एकिव गावाकडे येणारा रस्ता आहे. एकीव गावातील प्रसिद्ध पाबळ धबधब्यामुळे या परिसरात पर्यटकांचा वावर असतो. या रस्त्याच्या कडेला पारांबे गावच्या हद्दीत हा कचरा सकाळी लवकर आणून टाकला. तसेच या कचऱ्याला आग लावण्यात आली. या परिसरात सातार्याहून येणाऱ्या व्यक्तींच्या निदर्शनास हा प्रकार आला. हा कचरा जाळल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. येणाऱ्या जाणाऱ्यांना याचा त्रास होत होता. शासकीय नियमाप्रमाणे अशा वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावणे अपेक्षित आहे. असे असताना हा कचरा कास परिसरातील निर्जन ठिकाणी आणून जाळण्याच्या या प्रकारामुळे परिसराचे आरोग्य व सौंदर्य धोक्यात येत आहे. कास पठार कार्यकारी समितीचे सदस्य ज्ञानेश्वर आखाडे या ठिकाणाहून जात असताना त्यांनी हा प्रकार पाहिला. संबंधित औषधांच्या पाकिटावर कंपनी व गोळ्या यांची नावे आहेत. संबंधित विभागाने कचऱ्याची पाहणी करून नेमका कोणी हा प्रकार केला आहे, याचा शोध घेवून कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे.