वार्ताहर / कास
सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास धरणाच्या भिंतीची उंची वाढविण्याचे काम जोमात सुरु आहे. मात्र धरणक्षेत्रासाठी जमीन संपादीत झालेल्या कास ग्रामस्थांच्या मागण्यांकडे वारंवार निवेदने देऊन बैठका घेऊनही प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने कास धरण कृती समीतीने आज धरणाचे काम बंद पाडुन धरणाच्या भिंतीवर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.
कास धरणासाठी आतापर्यंत तीनवेळा ११५ हेक्टरहुन अधिक जमीन संपादीत करण्यात आली असुन टप्याटप्याने जमीन संपादीत केल्याने त्यांना पुर्नवसन कायदा लागु केला नाही. तिसऱ्या टप्यात जमीन संपादन होताना अनेक खातेदार भुमीहीन होणार असल्याने सर्वांना पुर्नवसन कायदा लागु करा, कुटुंबातील एकाला नगरपालिकेत सरकारी नोकरी दया. धरणाच्या बाजुने रिंगरोड करा, जुने मंदीर पाण्यात गेल्याने नवीन मंदीर बांधुन दया. मुलकी पड गट नं ७० मध्ये गावठाणासाठी जागा उपलब्ध करून परवानगी दया, सातारा-कास-बामणोली प्राजि मार्ग २६ जुन्या सर्वेनुसारच त्वरीत करा व तो प्रमुख रस्ता कॅनॉलच्या बाहेरुन गावच्या बाजुनेच करावा, स्मशानभुमीसाठी जागा उपलब्ध करून बांधुन दया, पुर्नवसन दाखले दया, आदी विविध मागण्या घेऊन कास ग्रामस्थांनी धरणाचे काम बंद पाडून धरणाच्या भिंतीवर बेमुदत ठिय्या अंदोलन सुरु केले आहे.
धरणाचे काम बंद पाडुन ग्रामस्थांनी धरणावर बेमुदत अंदोलन सुरु करताच जलसंपदाविभागाचे आधिकारी नगरपालिकेचे अधिकारी, संबधित काँट्रॅक्टर यांनी धरणाकडे धाव घेऊन ग्रामस्थांना मागण्या मान्य होतील, आंदोलन मागे घ्या, असे तोंडी आश्वासन देवून विंनती केली. मात्र ग्रामस्थांनी सपुर्ण मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत धरणाचे काम चालु देणार नाही व आंदोलनही मागे घेणार नसल्याचे सांगितले.









