कासेगाव / वार्ताहर
कासेगाव येथील आशिया महामार्गावर चार वाहने एकमेकांवर आदळून झालेल्या विचित्र अपघातात वाहनांचे सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित झालेली नाही.
याबाबत माहिती अशी की, कासेगाववरून कोल्हापूरच्या दिशेला जाणाऱ्या आशियाई महामार्गावर डायनो हॉटेल शेजारी एक कंटेनर जीजे १२ बीडब्लू ६३४४ पंक्चर काढण्यासाठी रस्त्याच्या कडेला थांबला होता. पंक्चर काढण्यासाठी थांबल्यानंतर ठेवलेला टॉपर वेळीच न दिसल्याने मल्हारपेठ हून पेठ – इस्लामपूरकडे जाणारी मोटारकार एमएच १० जीडी ९८२१ सदर कंटेनरवर आदळली. चालक मधुसूदन भांबुरे यांनी गाडीचा वेग कमी करताच पाठोपाठ येणारी चारचाकी डस्टर गाडी एमएच ०९ डी एक्स ८५७४ डॅश देऊन बाजूला झाली व त्याच्यामागून येणारी बोलेरो गाडी एमएच १० जीडी ९८२१ गाडीवर आदळली.
यामध्ये मोटार कार एमएच १० जीडी ९८२१ व एमएच ०९ डी एक्स ८५७४ यांचे अंदाजे दहा लाख रुपयाचे नुकसान झालेले आहे. अपघातसमयी महामार्गावर बघ्यांची एकच गर्दी झाली होती. कासेगाव पोलीस स्टेशन चे पोलीस हवलदार अविनाश लोहार, पोलीस हवलदार चंद्रकांत पवार, सुनील पाटील यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. या अपघाताची कासेगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.