ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
‘काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचा आधार घेत भाजप गैरप्रचार आणि गैरसमज पसरवत असून देशात विषारी वातावरण निर्माण करत आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.
दिल्ली येथे गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आयोजित अल्पसंख्याक संमेलनात शरद पवार बोलत होते. ते म्हणाले, देशात सांप्रदायिक शक्तीचा जोर वाढत आहे. या सर्व शक्तींच्या विरोधात लढण्याची आवश्यकता आहे. ‘काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाच्या माध्यमातून खोटा प्रपोगेंडा उभा केला जात आहे. काश्मीरी पंडितांना काश्मीर सोडावे लागले, पण तिथेही मुस्लिमांना लक्ष्य करण्यात आले आहे. भाजप धार्मिक आणि सामाजिक वातावरण बिघडवत आहे. या चित्रपटाला परवानगी देण्याची गरज नव्हती. देशातील सामाजिक सामंजस्य टिकवण्याचा प्रयत्न न करता हा चित्रपट करमुक्त करून भाजपचे नेते लोकांना तो बघण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत, अशी टीकाही पवार यांनी यावेळी केली.
जेव्हापासून भाजपचे सरकार आले तेव्हा संपूर्ण देश एकाच धर्माचा असावा असा प्रयत्न केला जात आहे. भाजप देशातील अभ्यासक्रम बदलवून लहान मुलाच्या मनात विष कालवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही पवार म्हणाले.