विकासाकरता पावले उचलण्यात आल्याचे नमूद : स्थितीवर नजर ठेवून : भारताशी भक्कम संबंध
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
अमेरिकेने जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी घेण्यात आलेल्या निर्णयांप्रकरणी भारत सरकारचे कौतुक करत एकप्रकारे नव्या घडामोडींना पाठिंबाच दर्शविला आहे. यात कलम 370 हद्दपार करण्याचा निर्णय सामील आहे. जम्मू-काश्मीरमध्ये होत असलेल्या बदलांवर नजर ठेवून आहोत. अमेरिकेचे धोरण बदललेले नाही. भारताच्या लोकशाही मूल्यांनुसार केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरमध्ये आर्थिक आणि राजकीय स्थिती पूर्णपणे सामान्य करण्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांचे स्वागत करत असल्याचे उद्गार अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी काढले आहेत.
भारत आणि अमेरिकेचे संबंध अत्यंत भक्कम आहेत. विदेशमंत्री एंटोनी ब्लिंकेन यांना भारतीय विदेश मंत्र्यांसोबत द्विपक्षीय स्वरुपात आणि क्वाडद्वारे चर्चा करण्याची संधी मिळाली आहे. अमेरिका सातत्याने भारताच्या संपर्कात असल्याचे प्राइस यांनी म्हटले आहे. क्वाड हा भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानचा समूह असून हिंदी-प्रशांतमधील मुक्त संचार निश्चित करण्याचा यामागे उद्देश आहे.
उत्तम संबंध
अमेरिकेचे भारत आणि पाकिस्तान या दोघांसोबत महत्त्वपूर्ण संबंध आहेत. अमेरिकेच्या विदेश धोरणात एकाचा लाभ आणि दुसऱयाला नुकसान असा दृष्टीकोन कधीच नसतो. आमच्यादरम्यान लाभदायक आणि सृजनात्मक संबंध आहेत. अशाप्रकारच्या संबंधांमध्ये एकासोबतच्या आमच्या संबंधांमुळे दुसऱया देशाचे महत्त्व कमी होत नसल्याचे प्राइस म्हणाले.
थेट चर्चा करावी
काश्मीर मुद्दय़ावरून भारत आणि पाकिस्तानने परस्परांमध्ये चर्चा करावी. भारतासोबत अमेरिकेची जागतिक व्यापक धोरणात्मक भागीदारी आहे. तर पाकिस्तानसोबत आमचे महत्त्वपूर्ण संयुक्त हितसंबंध आहेत. या संयुक्त हितसंबंधांच्या प्रकरणी पाकिस्तानी अधिकाऱयांसोबत मिळून काम करणे सुरूच ठेवण्यात येईल. काश्मीर आणि अन्य मुद्दय़ांवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील थेट चर्चेला अमेरिकेचे समर्थन असल्याचे प्राइस यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.









