ऑनलाईन टीम / श्रीनगर :
दहशतवाद्यांनी मागील 24 तासात काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दोन, शोपियां जिल्ह्यात एक आणि श्रीनगरमध्ये एक असे एकूण चार हल्ले केले. यामध्ये एक जवान शहीद झाला तर एक जखमी झाला आहे. तर अन्य हल्ल्यांमध्ये 1 काश्मिरी पंडित आणि 4 मजूर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुलवामा जिल्ह्यात सोमवारी दुपारी दोन कामगारांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही कामगार जखमी झाले. जोको चौधरी आणि थौग चौधरी अशी या कामगारांची नावे आहेत. तर येथेच रविवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हिमाचलचा ट्रकचालक आणि त्याचा सहाय्यक जखमी झाला. बिशन सिंग आणि सुशील दत्त अशी या दोन जखमींची नावे असून, दोघेही हिमाचल प्रदेशातील नूरपूर कांगडा येथील रहिवासी आहेत.
दरम्यान, सोमवारी रात्री उशिरा दहशतवाद्यांनी शोपियांच्या छोटीगाम गावात औषध विपेत्या काश्मिरी पंडित यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात सोनू कुमार बालाजी गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. श्रीनगरमधील लाल चौकतही दहशतवाद्यांनी अशाच प्रकारे हल्ला केला. यात एक जवान शहीद झाला. तर एक जवान जखमी झाला आहे. जखमी जवानावर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.









