मलुरा येथे चकमक- सुरक्षा दलांची शोधमोहीम सुरूच
वृत्तसंस्था/ श्रीनगर
काश्मीरच्या मलुरा येथील चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले आहेत. यातील एका दहशतवाद्याचे नाव नदीम अबरार आहे. नदीमला सोमवारी ताब्यात घेण्यात आले होते, तर दुसऱया दहशतवाद्याची ओळख पटविली जात आहे. नदीम अबरारने सुरक्षा दलांना स्वतःचे सहकारी लपून बसलेल्या ठिकाणी नेले होते. तेथेच चकमक सुरू झाली होती. युसूफ कांतरू आणि साकिब समवेत तीन दहशतवादी तेथे लपून बसले होते.
युसूफ आणि साकिब दोघेही मारले गेल्याचे सोमवारी रात्री उशिरा बोलले जात होते. पण मृतदेह हस्तगत झाल्यावरच याची पुष्टी होऊ शकेल असे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. मंगळवारी सकाळी पोलिसांनी मृतदेह पाहिले असता त्यात नदीम अबरार आणि एका विदेशी दहशतवाद्याचा मृतदेह सापडला आहे. चकमकीदरम्यान नदीमने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. याचदरम्यान तो मारला गेला आहे. तर अन्य दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.
सुरक्षा दलांनी एका मोठय़ा दहशतवादी कटाला उधळून लावत तीन दहशतवाद्यांना मलूरा येथे घेरले होते. दहशतवाद्यांच्या गोळीबारात एक असिस्टेंट कमांडेंट आणि सीआरपीएफचा एक सब इन्स्पेक्टर तसेच कॉन्स्टेबल जखमी झाला आहे.
आत्मघाती दहशतवाद्यांचा एक गट श्रीनगरमध्ये मोठा हल्ला घडवून आणणार असल्याची माहिती पोलिसांना सोमवारी दुपारी मिळाली होती. हे दहशतवादी श्रीनगर-बांदीपोरा मार्गावर मलूरा येथे लपले होते. पोलिसांनी सैन्य आणि सीआरपीएफसोबत मिळून मलूरा येथे शोधमोहीम राबविली होती. जवानांना पाहून दहशतवाद्यांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला होता.









