कलम 370 अन् 35 अ पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव – जनसंपर्क कार्यक्रम सुरू करणार
वृत्तसंस्था / श्रीनगर
गुपकार गटाच्या नेत्यांनी मंगळवारी माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी बैठक घेतली आहे. या बैठकीत कलम 370 आणि 35 अ पुन्हा लागू करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार करण्यात आला. बैठकीत मेहबूबा मुफ्ती, मुजफ्फर शाह, जावेद मुस्तफा मीर, अब्दुल रहमान वेरी आणि एम.वाय. तारिगामी सामील झाले.
जम्मू-काश्मीरमधील वर्तमान स्थितीवर चर्चा करण्यासाठी बैठक बोलाविली होती. या बैठकीत विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 पुन्हा लागू करण्याच्या मुद्दय़ावरून चर्चा करण्यात आल्याची माहिती गुपकार गटाचे प्रवक्ते आणि माकप नेते एम.वाय. तारिगामी यांनी दिली आहे.
गुपकार गटात 6 राजकीय पक्षांचा समावेश आहे. हा गट जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा पुन्हा दर्जा मिळावा अशी मागणी करत आहे. ऑगस्ट 2019 मध्ये केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा संपुष्टात आणला होता. या 6 राजकीय पक्षांसोबत अन्य पक्षांच्या काही नेत्यांनी या बैठकीत भाग घेतला आहे.
अवामी नॅशनल कॉन्फरन्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष मुजफ्फर शाह यांनी जनसंपर्क कार्यक्रम सुरू करण्यावर बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले आहे. प्रशासनाकडून या बैठकीला अनुमती देण्यात आली नव्हती.









