आशिया खंडातील सर्वात विस्तृत मानली जाणारी ‘तुलिप’ बाग आता सर्वांना पाहता येणार आहे. ही बाग काश्मीरमध्ये जगप्रसिद्ध दल सरोवरानजीक आहे. नवा पर्यटन मोसम सुरू होत असतानाच या बागेचे उद्घाटन झाल्याने काश्मीरला जाऊ इच्छिणाऱया पर्यटकांसाठी नवे दालन उघडले गेले आहे.

तसे पाहिल्यास या बागेचे औपचारिक उद्घाटन 2008 मध्येच तत्कालीन मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांच्या हस्ते झाले होते. या बागेचे नाव त्यावेळी इंदिरा गांधी मेमोरियल तुलिप बाग असे होते. दल सरोवरानजीकच्या झबरवान भागात छोटय़ा टेकडय़ांच्या प्रदेशात साधारणतः 30 टेक्टर (75 एकर) भूमीत ही बाग निर्माण करण्यात आली आहे. तथापि, काश्मीर खोऱयातील परिस्थिती सततच्या दहशतवादी कारवायांमुळे अनुकूल नसल्याने ही बाग लोकांना पाहू देण्यात येत नव्हती. मात्र, आता स्थिती बरीचशी सुधारल्याने बाग खुली करण्यात आली. हा 10 कोटी रूपयांचा प्रकल्प असून त्याचा दुसरा भाग अद्याप पूर्ण व्हायचा आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या बागेचे सौंदर्य आणखीनच खुलून येणार आहे.
काश्मीर हा पृथ्वीचा स्वर्ग आहे, तर ही बाग काश्मीरचा स्वर्ग आहे, असे या बागेचे वर्णन करण्यात येत. या बागेत परमोच्च दृष्टीसुख देतील असे दुर्मिळ वृक्ष, फुलझाडे व इतर वनस्पती लावण्यात आल्या आहेत. काश्मीर खोऱयातील साऱया निसर्ग सौंदर्याचे एकत्र दर्शन घ्यायचे असेल तर ही बाग पहावी, असे बोलले जाते. ज्यांना पर्यटनासाठी काश्मीरला जायचे आहे, त्यांच्यासाठी ही बाग नेत्रसुखाची पर्वणीच ठरणार आहे. काश्मीरमधील कोरोना परिस्थितीही बरीच नियंत्रणात असल्याने पर्यटकांनी निर्धास्तपणे येथे यावे. त्यांना सर्व सोयी, सुविधा आणि सुरक्षा सुनिश्चितपणे देण्यात येतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.









