केसरचे विक्रमी पिक- जीआय टॅगमुळे दुपटीहून अधिक किंमत
काश्मीर स्वतःच्या सौंदर्यासह केसरच्या शेतीसाठीही ओळखले जाते. यंदा काश्मीरमध्ये केसर उत्पादनाने मागील 30 वर्षांचा विक्रम मोडीत काढला आहे. राज्याच्या कृषी विभागानुसार 2020 मध्ये केसरचे 18 टन पिक प्राप्त झाले आहे. जगातील सर्वात महागडा मसाला असलेल्या केसरच्या यंदाच्या विक्रमी उत्पादनामागे नॅशनल सॅफ्रॉन मिशन कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. याचबरोबर काश्मिरी केसरला जीआय टॅग मिळाल्याने शेतकऱयांना याचा चांगला दरही मिळत आहे.
केवळ 1 किलोग्रॅम केसर तयार करण्यासाठी शेतकऱयांना 1.5 लाख केसरची फुले वेचावी लागतात. प्रत्येक फुलातून स्टिग्मा काढून तो सुकवावा लागतो. प्रचंड मेहनतीमुळे काश्मिरी लोक केसरच्या शेतीपासून दूर जाऊ लागले होते. केसरसाठीची भूमी सफरचंदांच्या बागांमध्ये रुपांतरित होत होती. काश्मीरमध्ये 1980 साली 5500 हेक्टर भूमीवर केसरची शेती करण्यात येत होती. पण आता केवळ 3500 हेक्टर इतकेच प्रमाण राहिले आहे. केंद्र सरकारने या समस्येचे गांभीर्य ओळखून राष्ट्रीय सॅफ्रॉन मोहिमेला मंजुरी दिली होती.
मोहिमेचा प्रभाव जाणवतोय

काश्मीरच्या श्रीनगर, पुलवामा आणि बडगाम जिल्हय़ांमध्ये केसरची शेती केली जाते. यातील अडचणी दूर करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली होती. यांतर्गत सिंचनासाठी स्प्रिंकलर यंत्रणेचा वापर करण्यात आल. केसरच्या बियाणांची गुणवत्ता वाढविण्यात आली. शेतकऱयांना पिकवाढीसाठी प्रशिक्षण देण्यात आले. 2010 मध्ये प्रति हेक्टर 1.8 किलो केसर प्राप्त व्हायचे. 2020 मध्ये हाच आकडा 4.8 किलोग्रॅमवर पोहोचला आहे.
किंमतही जवळपास दुप्पट
इराण सध्या सुमारे 500 टन केसरचे पिक घेतो. काश्मीर 20-30 टनाच्या उत्पादनासह दुसऱया स्थानावर आहे. अफगाणिस्तानाही केसरचे उत्पादन 12 टनापर्यंत पोहोचले आहे. काश्मिरी केसरला जीआय टॅग मिळण्यापूर्वी मोठे व्यापारी इराणमधून स्वस्त केसर आणून ते काश्मिरी असल्याचे सांगून विकत होते. पण जीआय टॅग मिळाल्याने ही फसवणूक थांबली आहे. काश्मिरी केसरची प्रतिग्रॅम किंमत 185 रुपयांवर पोहोचली आहे.









