जळगाव येथील चित्रकार राजू बाविसकर यांची जाणीव प्रगल्भ तर आहेच परंतु त्यातून ते शोषणमुक्तीचा विचार देऊ पहात असल्याने त्यांच्या चित्रविचाराची कृती ही बहुजन हिताय अशीच आहे.
एखाद्या माणसाची मुळे त्यांच्या गरिबीत असली तरी त्या मुळांचा चित्रकले सारख्या माध्यमातून शोध घेण्यासाठी भवतालच्या शोषणाबद्दलचीही संवेदनशीलता त्याला कायम आपल्या आत जागृत ठेवावी लागते. कोरोनामुळे ज्या मजुरांना आपला जीव गमवावा लागला, त्यांची अवस्था जनावरापेक्षाही वाईट झाली अशांच्या वेदनेचा आपल्या चित्रातून वेध घेणाऱया जळगाव येथील चित्रकार राजू बाविसकर यांची ही जाणीव प्रगल्भ तर आहेच परंतु त्यातून ते शोषणमुक्तीचा विचार देऊ पहात असल्याने त्यांच्या चित्रविचाराची कृती ही बहुजन हिताय अशीच आहे. हाच विचार त्यांच्या चित्रकेलेच्या मुळाशी असल्यानेच मुंबई जहाँगीर आर्ट गॅलरीपासून विविध ठिकाणी भरलेल्या त्यांच्या चित्र प्रदर्शनाला विचारी वर्गाचा प्रतिसाद मिळत गेला.
चिंता आणि गरिबीच्या मधल्या फटीतून प्र्रगती हा शब्द दिसेलच याची काही शाश्वती नसते आणि समजा दिसलाच हा शब्द तर त्याला भूक नावाची गोष्ट खाऊन टाकते. बाविसकर यांचे हे विधान स्वतःसाठी असले तरी ते कोरोनाच्या थैमानात पायपीट करणाऱया मजूरवर्गालाही लागू होत असल्याने त्यांचा चित्रविचार हा मानवी नाते घट्ट करणारा आहे. ‘भूक खाऊन टाकते प्रगती’ अशा घरातूनच, समाजातूनच त्यांच्या जगण्याचा प्रारंभ झाल्याने चित्रकलेची त्यांची नजरही तशीच बनत गेली. म्हणूनच ते म्हणतात ते बरोबरच आहे की चित्रकला हे मनोरंजनाचे माध्यम होऊ शकत नाही. या संदर्भाने ते पुन्हा आपल्या मागच्या जगण्याकडे बघताना म्हणतात, गावकाम करणे, सुपड, डालक्मया विणणे, मौतेला डफड वाजवणे, बँड वाजविणे हे आमच्याच घरी नाही तर माझ्या सर्व समाजाने परंपरेने आलेला हा धंदा स्वीकारलेला. पिढय़ा न पिढय़ा सर्व घाणीतले काम माझ्याही वाटय़ाला आले होते. जन्माने मिळालेली जात जन्माआधी नाकारण्याची व्यवस्था राहिली असती तर माझ्यासारख्या हजारो मुलांनी आजही नाकारलीच असती. घरात चित्रकलेचा कुठलाही संबंध नाही. शाळेत मात्र चित्रकलेने थोडी उत्सुकता वाढवली होती. त्या ध्यासामागे आपण धावू शकतो ही जाणीव चित्रातून हळूहळू दिसत होती. शाळेच्या वह्यांवर, साइनबोर्ड रंगवत या सर्व गोष्टीमधून चित्रकलेचा पिच्छा करत तिच्या मागचे धावणे थांबवले नाही. या धावण्यात कधी वाटायचे आपण मोठा साइनबोर्ड पेंटर झालो पाहिजे तर कधी खूप मोठा प्रख्यात बँड माश्टर झाले पाहिजे. पण या सर्व गोष्टींमध्ये शेवटी एक लक्षात आले की शिक्षण हाच माणसाचा पुनर्जन्म आहे. आणि तोच फक्त गरिबी नि चिंता या फटीतून प्रगती बघण्याचा मार्ग. राजू यांना अशा प्रकारे शिक्षणाचे महत्त्व कळत गेल्यानेच त्यांची आजवर चित्रकार म्हणून ते कोणत्या वर्गाच्या बाजूने आहेत ही ओळख अधिक ठळक होत गेली. प्रारंभी त्यांची अनेक नियतकालिकेतून चित्र छापून आली. चित्रप्रदर्शनही झाली. ‘कलापुष्प’ या अंकाच्या माध्यमातून आपले चित्र रेखाटन इतरांपेक्षा वेगळे आहे. हे त्यांच्या प्रथम लक्षात आले. बाळासाहेब पाटील यांचा चित्रकलेवरचा वार्षिक अंक निघायचा. त्यात बऱयाच मोठय़ा चित्रकारांची चित्रे, रेखाटने छापून येत. त्या प्र्रत्येक अंकात बाविसकर यांचीही रेखाटने असायची. परंतु शहरी, महानगरी चित्रकारांच्या चित्रात ही चित्रे वेगळी होती आणि ती इतर चित्रकारांनाही वेगळी वाट शोधत आल्याची जाणीव व्हायची. त्याला कारणही तितकेच महत्त्वाचे होते. सर्व महानगरी बाज असलेल्या सर्व चित्रांमध्ये ही चित्रे मानवी व्यथेने एकमेकांच्या गळय़ाला मिठी मारणारी असल्याने इतरांना ती आपलीच व्यथा असल्याची वाटायची. या संदर्भात राजू म्हणतात, मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन या चित्रांची वेदनेची स्वतंत्र व्याख्या होत गेली. माझी चित्रे गावगाडय़ाची व्यवस्था असणारा शेतमजूर ते गुराढोरांपर्यंत त्यांचे दैनंदिन जगणे हे स्वरूप घेऊन येतात. त्यांच्या जगण्याच्या वर्तमानातही खूप काही बदल घडत नाही. बाविसकर कष्टकरी माणसाला ज्या पातळीवरून बघतात ते त्यांचे चित्रकार म्हणून स्वतंत्र बघणे आहे. राजू म्हणतात, कोणत्याही कष्टकरी समूहाचे संसाधन, परिसर हे मला चित्रात मनोरंजनाच्या पलीकडे नेते. काहीतरी सूक्ष्म जाणिवेत घेऊन जात असेल तर तसे जगणाऱयाचे पहिल्यांदा मला खंगलेले, पिळलेले शरीरच दिसते. कुत्रे, गाय, बैल, म्हैस, झाड हेही आकार कधी मला आनंदाच्या रेषेकडे घेऊन गेले नाहीत. चित्रांना कुठलीही भाषा नसते. ती एक आंतरिक जाणीव असल्याने चित्रे नेहमी सजगपणे आपल्या आसपास फिरत असतात. माझी चित्रे वेदनेच्या जाणिवेचे वाहक आहेत. मी चित्र काढतो ती कुठेतरी मनात चाललेल्या अनेक सामाजिक वेदनेचा तळ शोधणारी असतात. बाविसकर यांच्या चित्रात एकाच जातवर्गाची भूमिका मांडली जात नाही तर अख्ख्या कष्टकरी समूहाची तीव्रपणे ते मांडणी करतात. इथेच ते चित्रकार म्हणून यशस्वी होतात. त्यांची चित्रकार म्हणून एक राजकीय भूमिका आहे. कलावंत सामाजिक भान ठेवून कलेच्या माध्यमाने प्रश्न मांडत असतो तो जातपात, धर्म किंवा कोणत्याही राजकीय पक्षासाठी विचार कलेत मांडत नाही तर विशिष्ट समाजाला होणाऱया लाभापेक्षा सर्व वर्गाला जास्तीचा लाभ मिळेल यासाठी त्याची कला काहीतरी आपले म्हणणे मांडत असते. समाजाच्या हिताच्या बाजूने कलावंत उभा राहिला पाहिजे आणि हेच बाविसकर यांना कलावंत म्हणून महत्त्वाचे वाटते. बाविसकर यांच्या राजहंस प्रकाशनाकडून प्रसिद्ध होत असलेल्या ‘काळय़ानिळय़ा रेषा’ या आत्मचरित्राचा भाग सध्या युगवाणी नियतकालिकातून प्रसिद्ध होत असून त्याला वाचकांचाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ते अशा शोषित वर्गातून येणाऱया चित्रकाराचे कदाचित मराठीतील पहिलेच आत्मचरित्र असेल. माणूस असणे, त्याला टिकवणे महत्त्वाचे असते. त्यांच्या आतल्या संवेदनशीलतेचे विराट दर्शन घडविणे हेच कलावंतांचे प्रमुख काम असते. तो त्याची भूमी जेव्हा तपासतो तेव्हा त्या भूमीतले दुःख, दैना मांडताना त्यातील सत्त्वही टिकवण्याचा आग्रह आपल्या कलेतून धरत असतो. राजू बाविसकर हेच काम आपल्या चित्रकलेतून करत असल्यानेच ते समकालीन चित्रकारांमध्ये आपले वेगळेपण सिद्ध करतात. म्हणूनच त्यांनी कोविड 19च्या मानवी मृत्यृला जोडून घेताना मृत्यृचे शतखंडीत विश्वही आपलेसे केले आहे.
अजय कांडर








