प्रतिनिधी / नांद्रे
गेल्यावर्षी महापूर, अतिवृष्टी, ढगफुटी आणि आता कोरोना, लॉकडाऊनच्या संकटाने समान्य जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे. शेतकऱ्यांची अवस्था तर ना घरका ना घाटका अशी झाली आहे.
भारत हा शेतीप्रधान देश असून पाच लाख ९५ हजार ५१५ खेड्यात वसलेला शेतकरी वर्ग हा देशाचा पोशिंदा आहे. मात्र त्यांच्या यातना तो बोलूही शकत नाही. तोंड दाबून मुक्यांचा मार सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना लूटून तयार झालेल्या भांडवलाच्या जीवावर शोषित राज्यकर्ते आणि अधिकाऱ्यांनी संपत्तीचे इमले उभे केले आहेत. आमदार, खासदारांनी विधानसभेत, लोकसभेत न जाताही पगार घेतले. या आमदार, खासदारांनी आयुष्यभर पेन्शन मिळवणारे कायदे पास करून घेतले. मात्र काबाडकष्ट करणारा शेतकरी गेली चार महिने मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी यांच्याकडे शेतीसाठी पीक कर्जे मिळण्याबाबत निवेदन देत फिरत आहे. हंगाम संपण्याची वेळ आली तरी बँका कर्जे देण्यास तयार नाहीत.
मग का शेतकऱ्यांनी अत्महत्या करायची का? शेतकऱ्यांची आत्महत्या म्हणजे काय असते? याच उत्तर का काळ्या आईची अहोरात्र कष्ट करून देशाला पोसणाऱ्या शेतकऱ्यांनी शोधायचं असतं? शेतकरी का शोधतील? कारण ते जगाचे पोशिंदे आहेत. त्यांची शेती आहे म्हणून? आपल्या काळ्या आईची निखळ संगोपन करताना मर मर राबायचं, खाण्या पिण्याची तम्हा न बाळगता, तटपूंज्या मिळकतीवर मन मारत जीवन जगायचं. शेती पाडायची नाही कारण लोक काय म्हणतील म्हणून कुवत नसतानाहि शेती पिकवायची.
अतिशय कठिण प्रसंगात स्वत:च्या जिवाचीही पर्वा न करता तोंडात मूग धरून गप्प शेती करत राहण हि त्यांची चूक आहे. अतिशय कठीण परिस्थितित अनेक यातना भोगत मन मारून, स्वत:चा जीव धोक्यात घालून या महामारीत देखील देशबांधवाना अन्न धान्य मिळावे म्हणून तो कष्ट करत आहे. तुम्हाला वेळोवेळी जाब विचारला नाही हि त्यांची चूकच होती. राज्यकत्यांनो त्यांची एकच मागणी त्यांच्या चूका बेरजेच्या होत्या.त्यामध्ये वजाबाकी कोठे नाही. त्यांचा व त्यांच्या जमाखचाचा हिशोब ते तुमच्या माथी मारू शकत नाहीत. कारण ते शेतकरी आहेत व त्यांच्या काळ्या आईच पालनपोषणही ते मन मारून योग्य रितीने करतच आहेत. त्यांना अत्महत्या करू देऊ नका. शेतकऱ्यांच क्षणाक्षणाला मरणं असतं. त्यांना क्षणोक्षणी मरण यातना देऊ नका त्यांचेही जीवन अनमोल आहे.