प्रतिनिधी / सातारा :
सातारा वनविभाग अनेकदा या ना त्या कारणाने चर्चेत असतो. आताही वनविभागातल्या कर्मचाऱ्यांच्या कृपेने चक्क वनविभागाच्या हद्दीतील सागवानाच्या झाडांची तोड होवून ती झाडे गायब केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकाराची कानकुण वनविभागाच्या वरीष्ठांपर्यंत गेल्यानंतर केवळ स्थळ पाहणी झाल्याचे समजते. मात्र, ती झाडे तोडली कोणी?, वनविभागातला तो कर्मचारी कोण?, त्याच्यावर नेमकी काय कारवाई केली जाणार की त्याला अभय दिले जाणार अशी उलटसुलट चर्चा सातारा तालुक्यामध्ये रंगू लागली आहे.
झाड कोणतही असो ते तोडलं तर कारवाई झाली पाहिजे. वनविभाग खासगी क्षेत्रातील झाडे तोडली की त्यास परवानगी आहे का असे विचारते. परंतु त्यांच्याच क्षेत्रातील अन्य कोणी त्रयस्थ व्यक्तीने चक्क जेसीबीच्या सहाय्याने रस्ता करुन अनेक वर्षापूर्वीची मोठी सागवानाची झाडे तोडून गायब केली असतील तर त्यास वनविभागातील कर्मचारीही सहभागी असल्याचा वास येतो. सातारा तालुक्यातील काळोशी या गावामध्ये गेल्या पाच ते सहा दिवसांपूर्वी वनविभागाच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. वनविभागाच्या हद्दीतून सागवानाच्या झाडाची तोड झाल्याची जेव्हा वनविभागाच्या वरीष्ठांना मिळाली तेव्हा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्रयस्थ समिती घटनास्थळी पाठवून पाहणी केली. स्थळ पाहणीत त्यांना नक्कीच झाडे तोडल्याचे दिसले. परंतु तीन दिवस उलटले तरीही सातारा वनविभागाने झाडे कोणी तोडली. तोडलेली झाडे गेली कुठे?, याचा कसलाच गवगवा केला नाही. त्यामुळे सातारा वनविभागाचा कारभार नेमका कसा सुरु आहे, त्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
परळी भागात विरप्पन आला काय?
झाडांची तस्करी म्हणलं की विरप्पन हे नाव समोर येते. तसेच सातारा तालुक्यातील परळी भागाला निसर्ग सौंदर्य लाभले आहे. याच भागात निसर्गाची लयलुट करुन झाडांची तोड करणारा विरप्पन कोण आला आहे? याचीही चर्चा सुरु असून ही झाडे नेमकी कोणी तोडली, जेसीबी कोणाचा होता?, कटर मशिन कोणाची होती. तोडलेली लाकडे कोठे नेली हे सारे गुलदस्त्यात आहे. याचा उलघडला मुंगसाचे ब्रश शोधणाऱ्या आणि वाघाची कातडी शोधणाऱ्या वनविभागाला का लागत नाही, असाही सवाल उपस्थित होत आहे.









