आता समाजात फूट पाडूनही देशविघातक कृत्ये- एनएसए डोवाल यांचा इशारा
हैदराबाद / वृत्तसंस्था
बदलत्या काळात देशाविरुद्ध युद्ध करण्याच्या स्वरुपातही बदल झाला आहे. युद्धाचे नवे शस्त्र म्हणून नागरी समाज नष्ट करण्याची तयारी सुरू आहे. वेगवेगळय़ा समाजात फूट पाडून देशविघातक कृत्ये केली जात आहेत. या बदलत्या परिस्थितीशी लढण्यासाठी सुरक्षा दलांनी सज्ज व्हायला हवे, असे प्रतिपादन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांनी केले आहे. हैदराबादमध्ये प्रोबेशनरी आयपीएस अधिकाऱयांच्या दीक्षांत समारंभात बोलताना त्यांनी यासंबंधी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
राजकीय आणि लष्करी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी युद्धे आता पुरेशी प्रभावी नाहीत. वास्तविक युद्धे खूप महाग असतात, प्रत्येक देशाला ते परवडणारे नसते. त्याच्या निकालाबद्दल नेहमीच अनिश्चितता असते. अशा परिस्थितीत समाजात फूट पाडून, संभ्रम पसरवून देशाचे नुकसान होऊ शकते. भारताचा विचार करता देशाच्या चारही बाजूंना वेगवेगळी आव्हाने आहेत. या सर्व आव्हानांशी केंद्रीय आणि राज्य पोलीस दले संयुक्तपणे मुकाबला करत आहेत, असेही डोवाल म्हणाले.
लोकांना लक्ष्य करणे खेदजनक
युद्ध किंवा संघर्ष माजविण्यासाठी आता सर्वसामान्य लोकांनाच लक्ष्य केले जात आहे. अलिकडच्या काळात युद्धाच्या चौथ्या पिढीच्या रूपाने एक नवीन आघाडी उघडली गेली असून समाजकंटकांचे लक्ष्य समाज हेच आहे. पाकिस्तान, चीन, म्यानमार आणि बांगलादेशसोबतच्या आमच्या सीमेची लांबी 15,000 किमी आहे. या ठिकाणी सीमा व्यवस्थापनात पोलिसांची मोठी भूमिका असायला हवी, असे ते म्हणाले.
पोलीसही सांभाळणार सीमा व्यवस्थापन
भारतातील 32 लाख चौरस किलोमीटर परिसरात कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थापनाची जबाबदारी पोलीस दलावर आहे, पण आता ही भूमिका आणखी वाढेल. आपल्या 15,000 किमी लांबीच्या सीमेवर विविध प्रकारच्या समस्या आहेत. भविष्यात या देशाच्या सीमा व्यवस्थापनाचीही जबाबदारी तुमच्यावर असेल, असे डोवाल यांनी आयपीएस अधिकाऱयांशी बोलताना स्पष्ट केले.









