एकाला अटक : 25 ओंडके जप्त : मोले वन्यजीव विभागाची कारवाई
प्रतिनिधी/ फोंडा
मोले वन्यजीव विभागाच्या काले येथील राखीव वनक्षेत्रातून तस्करीला गेलेले सागवानी झाडाचे साधारण 25 ओंडके जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी विनस मास्कारेन्हास (35, रा. काले) या संशयिताला मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले असून मोले वन्यजीव विभागाने बुधवारी ही कारवाई केली. या सागवानी ओंडक्याची किंमत अंदाजे रु. 5 लाख असल्याचे वन अधिकाऱयांनी सांगितले.
संशयिताच्या घरातून 15 तर घटनास्थळावरुन 10 ओंडके जप्त करण्यात आले आहेत. काले भागात सागवानी झाडांची तस्करी होत असल्याची माहिती वन्यजीव विभागाला मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. संशयिताला सांगे न्यायालयासमोर सादर केले असता, पंधरा दिवस चौकशीसाठी वन्यजीव विभागाच्या कार्यालयात हजर राहण्याच्या सशर्थ अटीवर जामिन मंजूर करण्यात आला आहे.
काले भागातील राखीव वनक्षेत्रातून मोठय़ा प्रमाणात सागवानी झाडांच्या तस्करीचे प्रकार मागील काही काळापासून घडत आहेत. एकाच बिटवर गेली अनेक वर्षे काम करणाऱया काही वनकर्मचाऱयांच्या संगनमतानेच ही तस्करी होत असल्याची चर्चा सध्या काले भागात सुरु आहे. यापूर्वीही काही नागरिकांनी राखीव वनक्षेत्रातील झाडे चोरीला जात असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. मोले वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक सिद्धेश नाईक, उपवनसंरक्षक अर्जून गावस व वनरक्षक डेनियल डिकॉस्ता यांनी ही कारवाई केली.









