ऐन कामाच्या हंगामात बैलजोडी गेल्याने हळहळ
वार्ताहर/ गुंजी
बैलजोडीला कालबाह्य बुरशीनाशक औषध लावल्याने बैलजोडीचा जागीच्गा मृत्यू झाल्याची घटना भालके के. एच. येथे सोमवारी दुपारी घडली. शिवाजी सिद्दू आळवणे असे बैलजोडी मालकाचे नाव आसून ते भालके गावचे गरीब शेतकरी आहेत. बैलांना तांबा (गोचीड) झाल्याने आळवणे यांनी गतवर्षी आणून ठेवलेल्या थिमेट या बुरशीनाशक औषधाचा वापर अनावधनाने केला. बैलांना हे औषध लावून त्यांनी बैलजोडी परसात बांधली. मात्र काही वेळाने एक बैल जोरात उधळला व जमिनीवर आपटून मरण पावला. त्यानंतर त्यांनी तातडीने गुंजीतील पशुवैद्याला बोलावून घेतला. मात्र काही वेळातच दुसऱया बैलाचाही मृत्यू झाला.
शासकीय मदत करण्याचे आश्वासन
ऐन पेरणी मशागतीच्यावेळीच बैलजोडी गेल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याची माहिती ग्रा. पं. अध्यक्ष सुभाष घाडी यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन शेतकऱयाचे सांत्वन केले. तसेच गुंजी विभाग नंदगड एपीएमसीचे सदस्य सुभाष पाटील यांनीही मृत बैलजोडी पाहून हळहळ व्यक्त करून शासकीय मदत करण्याचे आश्वासन दिले.
सदर बैलजोडी मृत पावल्याने त्या शेतकऱयाचे जवळ जवळ 50 ते 60 हजाराचे नुकसान झाले आहे. सध्या पेरणी हंगाम जवळ आला असून आर्थिक परिस्थितीही बेताची आहे. त्यामुळे शेती व्यवसाय कसा करावा याचीच चिंता लागून राहिली आहे.
शेतकऱयांनी सावधानता बाळगण्याची गरज
याविषयी गुंजीचे पशुवैद्य डॉ. चरंतीमठ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेविषयी हळहळ व्यक्त केली. शेतकऱयांनी सावधानता बाळगण्याची गरजही व्यक्त केली. अशा घटनाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रत्येक शेतकऱयांनी जनावरांना औषध लावणे किंवा घालण्यासाठी पशुतज्ञांचा सल्ला घेण्याची गरज आहे. तसेच कृषी पिकांची कोणतीही औषधे जनावरांना कधीच वापरु नये, तसेच कालबाह्य औषधांचा त्वरित नायनाट करावा, असे आवाहनही त्यांनी केले.









