दुसऱया राज्यात स्थलांतरीतांना होणार फायदा-‘आयएन’ ची नवी नंबरप्लेट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकार कार किंवा बाईकच्या सर्व राज्यात चालणाऱया नोंदणीच्या नंबरसाठी आता एक नवी योजना आणण्यावर काम करत आहे. याअंतर्गत कार किंवा बाईकचा नोंदणी नंबर आयएनपासून सुरू होणार आहे. अनेकांना नोकरी बदलीनिमित्त एका राज्यातून दुसऱया राज्यात जावे लागते. दुसऱया राज्यात स्थलांतर झाल्यावर सदरच्या व्यक्तिला एकतर आपली कार किंवा दुचाकी विकावी लागते आणि त्या राज्यात नव्याने गाडी घ्यावी लागते तर दुसऱया प्रकारात ज्या राज्यात कार वा बाईक नेली आहे तिथे नव्याने नोंदणी करून घ्यावी लागते. यामध्ये अनेकजण पहिला पर्याय अवलंबताना दिसतात. दुसऱया प्रकारात खूप कष्ट उपसावे लागतात व खर्चही जास्त येतो. केंदाचा नवा पर्याय वरीलप्रमाणेच जर का लागू झाला तर एका राज्यातून दुसऱया राज्यात स्थलांतर केल्यास कोणतीही अडचण जाणवणार नाही. सरकार यासंबंधीची योजनेवर विचार करत असून त्याबाबत चाचणीही सुरू असल्याचे समजते.
सध्याच्या नियमावलीप्रमाणे दुसऱया राज्यातील गाडी 12 महिनेपर्यंत स्थलांतरीत झालेल्या राज्यात वापरता येते. या 12 महिन्यात मात्र गाडीमालकाला नव्या राज्यात नोंदणीकरण करणे आवश्यक असते. याअंतर्गत ज्या राज्यात गाडी वापरत आहात तिथला रोड टॅक्स चालकाला भरावा लागतो. जसे की बेंगळूरात रोड टॅक्स सर्वात अधिक आहे. दुसऱया राज्यात स्थलांतरीत होण्याआधी गाडी मालकाला एनओसी घ्यावी लागते. या साऱया झंझटीपासून सुटका हवी असल्यास आयएन ही नवी नंबर प्लेट फार उपयोगाची ठरणार आहे. सरकारी कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातले कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक यांच्या गाडीच्याबाबतीत सध्या नव्या नंबर प्लेटनुसार प्रयोग केला जात आहे. आयएन नावाने प्लेट जारी केल्यानंतर एका राज्यातून दुसऱया राज्यात जाणे सोपे होणार आहे. यामुळे दुसऱया राज्यात पुन्हा वाहन नोंदणी करायची गरज भासणार नाही.









