राजस्थानमधील दुर्घटना: लग्नाच्या 12 तास आधी वराचा मृत्यू
@ कोटा / वृत्तसंस्था
राजस्थानमध्ये वऱहाडाची कार चंबळ नदीमध्ये कोसळून झालेल्या अपघातामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये नवरदेवाचाही समावेश आहे. बरवाडावरून परतत असताना मध्यरात्री कारला अपघात झाला. अपघातामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत कार नदीतून बाहेर काढली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या मतदारसंघात ही दुर्घटना घडली असून या दुर्दैवी घटनेवर त्यांनी दुःख व्यक्त केले आहे.
सदर वऱहाड उज्जैनला जात होते. वऱहाडय़ांची बस पुढे निघून गेली होती आणि नवरदेवाला घेऊन जाणारी कार रस्ता भरकटली होती. याचदरम्यान चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि गाडी नदीत कोसळली. यानंतर बचाव पथकाने कार नदीतून बाहेर काढली आहे. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात झाल्याच्या 2 ते 3 तासानंतर बचावकार्यास सुरुवात झाली. मदत व बचावकार्यावेळी घटनास्थळी मोठय़ा प्रमाणात लोकांची गर्दी जमली होती. कारमधून सात आणि नदीतून दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, अशी माहिती कोटाचे पोलीस अधीक्षक केसर सिंह शेखावत यांनी दिली आहे. मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले होते. विच्छेदन करून सर्व मृतदेह दुपारी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
मध्यरात्रीनंतर काळाचा घाला
वऱहाडाची अपघातग्रस्त कार शनिवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास सवाई माधोपूरमधील बरवाडा येथून मध्यप्रदेशातील उज्जैनकडे रवाना झाली होती. सुमारे दोन तासांनंतर तीन वाजण्याच्या सुमारास ती कोटा येथे अनियंत्रित होऊन चंबळ नदीत पडली. कारमध्ये अविनाश वाल्मिकी या वरासह एकूण नऊ जण होते. कारचालक वगळता हे सर्वजण वराचे नातेवाईक होते. रात्री तीन वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या अपघाताबाबत सुरुवातीला कोणालाच माहिती मिळू शकली नाही. पोलीस प्रशासनाला सकाळी याची माहिती मिळाली मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
सनई-चौघडय़ांऐवजी आक्रोश
सकाळी अपघाताचे वृत्त समजताच बरवडा येथील वर अविनाश वाल्मिकी यांच्या घरात एकच गोंधळ उडाला. लग्नाच्या आनंदाचे दुःखात रुपांतर झाले. रात्रीपर्यंत ज्या घरातून शहनाई आणि मंगल गाणी गुंजत होती, तिथून आरडाओरडा सुरू झाला. या हृदयद्रावक घटनेची माहिती मिळताच आजूबाजूचे लोक वराच्या घरी पोहोचले. यादरम्यान नातेवाईकांचा आरडाओरडा ऐकून लोकांच्या हृदयाचा बांध फुटला. अविनाशचा रविवारी दुपारी 3 वाजता नेहा उर्फ गौरीसोबत विवाह होणार होता. पण विवाहापूर्वी 12 तास म्हणजे पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अविनाशचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात वराचे दोन भाऊ, वराचा मेहुणा, कारचालक इस्लाम तेली यांचा जागीच मृत्यू झाला.









