सोमवारी पहाटे साडेपाच वाजताचा स्वयं अपघात : मृत नवजोडपे पुण्यातील बुधवारी गोव्यात आले होते पर्यटनासाठी
प्रतिनिधी /म्हापसा
बागा कळंगूट येथील खाडीत सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास पर्यटक कारगाडी कोसळल्याने शुभम नितीन दडगे (25) तसेच इश्वरी देशपांडे (28) या पुणे येथील जोडप्यास जलसमाधी मिळाली. अपघाताची माहिती मिळताच पीळर्ण अग्निशामक दलाच्या कर्मचाऱयांनी घटनास्थळी धाव घेत खाडीत बुडालेल्या गाडीसहित मृतदेह बाहेर काढले.
कळंगूट पोलिसांनी दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय इस्पितळात पाठवून दिले आहेत. मयत शुभम दडगे आणि इश्वरी देशपांडे बुधवारी सकाळी पुण्यातील आपल्या निवासस्थानाकडून गोव्यात येण्यासाठी बाहेर पडले होते. त्यानंतर मात्र घरच्यांशी त्यांचा संपर्क नव्हता.
सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बागा येथील रस्त्यावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी सरळ जवळच्या खाडीत कोसळली. यावेळी शुभम आणि इश्वरी गाडीच्या सेंट्रल लॉकमुळे गाडीतच अडकून राहिल्याने नाकातोंडात पाणी घुसल्याने जागच्या जागीच त्यांचा बुडून मृत्यू झाला.
पहाटे साडेपाचच्या दरम्यान घटनास्थळी पोहोचलेल्या हणजूण पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने गाडीत अडकून पडलेल्या मृत शुभम तसेच इश्वरी देशपांडे यांना प्राथामिक उपचार पुरविण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. हणजूणचे निरीक्षक सुरज गावस पुढील तपास करीत आहेत.
बांबोळीत भीषण अपघातात पर्वरीचा युवक जागीच ठार

पर्वरी पुंडलीकनगर येथील एका तरुणाचा बांबोळी येथे झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. युवकाच्या मृत्यूमुळे परिसरात दुःखाचे सावट पसरले आहे. आगशी पोलिसांनी अपघातस्थळी जाऊन पंचनामा केला केला.
पुंडलिकनगर येथील रोशन राणे यांनी रविवारी सकाळी नवी कोरी स्कॉडा कार (जीए-03- झेड-9424) खरेदी केली होती. नवीन कारमधून आपले दोन मित्र विराल मेहता (28) आणि वरूण राय यांना घेऊन तो फिरायला गेला होता. रात्री घरी परतताना बांबोळी येथील श्यामाप्रसाद स्टेडियमसमोर रस्त्यावर त्याचा कारवरील ताबा गेला. त्यावेळी वरूण राय हा कार चालवित होता. अपघात एवढा भीषणा होता की कारचा चेंदामेंदा झाला. त्यात कार चालविणारा वरूण राय जबर जखमी झाला तर मागे बसलेला विराल मेहता याचा जागीच मृत्यू झाला.
पेडणे वाहतूक विभागाचे नरेश नार्वेकर अपघातात ठार

पेडणे वाहतूक विभागात एएसआय म्हणून सेवा बजावणारे पवनवाडा केरी येथील नरेश नार्वेकर (51) हे काल सोमवारी दुपारी डय़ुटीवरुन घरी जाताना त्यांच्या कारगाडीच्या स्वयंअपघातात गंभीर जखमी झाले. त्यांना तुये इस्पितळात नेत वाटेच निधन झाले. हल्लीच त्यांना ए.एस.आय म्हणून बढती मिळाली होती. प्रामाणिक व मनमिळाऊ स्वभावाचे असलेल्या नरेश नार्वेकर यांच्या दुःखद निधनाने पोलीस कर्मचारी तसेच नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.









