मुगळखोड-इटनाळ कालव्याजवळील घटना : एक जण गंभीर : मृत अथणी येथील

वार्ताहर /कुडची
मित्राच्या आईला उपचारासाठी सोडून परत येत असताना झालेल्या कार अपघातात दोन युवक जागीच ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. सदर घटना शनिवार 11 रोजी मध्यरात्री 2 च्या सुमारास अथणी-गोकाक मार्गावरील मुगळखोड-इटनाळ कालव्याजवळ घडली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे समजते. विनायक चिदानंद कावेरी (वय 23), निंगराज माळी (वय 21) अशी मृतांची तर इरय्या मठपती (वय 17, तिघेही रा. अथणी) असे गंभीर जखमीचे नाव आहे. सदर अपघातग्रस्त कार एका झाडाला आदळून दुसऱया झाडाला जाऊन धडकल्याचे प्रथमदर्शींनी सांगितले.
याबाबत समजलेली माहिती अशी, इरय्याची आई आजारी असल्याने त्यांना उपचारासाठी नरगुंदला सोडण्यासाठी विनायक, निंगराज व इरय्या हे स्विफ्ट डिझायर (केए/53/सी/6995) ने गेले होते. इरय्याच्या आईला सोडून तिघेही अथणीला परतत होते. दरम्यान, मुगळखोड-इटनाळ कालव्याजवळील मुख्य मार्गावर त्यांची कार आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कारची रस्त्याशेजारील झाडाला जोराची धडक बसली. विशेष म्हणजे कार वेगात असल्याने एका झाडाला आदळून दुसऱया झाडावर आपटली. यात विनायक व निंगराज यांना गंभीर इजा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर इरय्या हा 20 ते 30 फुट लांब शेतात जाऊन पडला. तोही गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच अथणीचे डीवायएसपी एस. व्ही. गिरीश, सीपीआय के. एस. हट्टी, हारुगेरीचे पीएसआय राघवेंद्र खोत व सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर जखमी इरय्याला उपचारासाठी हारुगेरी सरकारी रुग्णालयात दाखल केले. तर विनायक व निंगराज यांचे मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी हारुगेरी रुग्णालयात पाठविले. त्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. रविवारी शोकाकूल वातावरणात विनायक व निंगराज यांच्यावर अत्यंसस्कार करण्यात आले. या घटनेची नोंद हारुगेरी पोलिसात झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.









