बुद्धिबळातील जागतिक अजिंक्यपद स्पर्धा
दुबई / वृत्तसंस्था
वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लसन व त्याचा रशियन आव्हानवीर इयान नेपोम्नियाची यांच्यातील जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतील पहिली फेरी ड्रॉ झाली. 14 फेऱयांच्या या वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील पहिल्या फेरीत उभयतांनी 45 चालीनंतर बरोबरी मान्य केली. 40 व्या चालीत rd7 ऐवजी kf4 ही चाल खेळणे आवश्यक होते, असे निरीक्षण कार्लसनने नोंदवले.
पांढऱया मोहऱयांनी खेळणाऱया रशियन आव्हानवीर नेपोने थ्री-फोल्ड रीपिटिशन मुव्हला पसंती दिली आणि त्यानंतर ही लढत बरोबरीत राहिली. रुई लोपेझच्या ओपनिंग लाईन्स लाभलेल्या या लढतीत कार्लसनने नवव्या चालीत मध्यातील प्याद्याचा बळी देत या लढतीत रंग भरला. या स्पर्धेचे समालोचन करणाऱया विश्वनाथन आनंदने काळय़ा मोहऱयांनी खेळणाऱया कार्लसनला प्याद्याचा दिलेला बळी पथ्यावर पडणारा ठरेल, असा अंदाज व्यक्त करत या चालीचे समर्थन केले होते.
पहिल्याच टप्प्यात वजिरावजिरी झाल्याने पुढील टप्प्यात हा सामना जवळपास समसमानत मोहऱयानिशी लढला गेला. दोन्ही प्रतिस्पर्ध्यांना परस्परांच्या रणनीतीविषयी काही आश्चर्य वाटले नसल्याचे आढळून आले नाही.
एकवेळ, कार्लसन पटावर नियंत्रण राखून असल्याचे चित्र होते. पण, नेपोने एकाच दिशेने मार्गोत्क्रमण कायम ठेवण्यात किंचीतही कसूर सोडली नाही. 36 व्या चालीला नेपोने जादाचे प्यादे दिले. पण, ही लढत अनिर्णीत राहणार, याचे संकेत त्यापूर्वीच मिळाले होते. या वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील दुसरी फेरी आज (शनिवार दि. 27) खेळवली जाणार आहे. कार्लसन यात पांढऱया मोहऱयांनी सुरुवात करेल.
पहिली फेरी पार पडल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना कार्लसनने आपल्याला आणखी सरस खेळ साकारणे शक्य झाले असते, पण, या निकालाने आपण खुश आहे, अशी प्रतिक्रिया दिली. जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत प्रथमच खेळताना कसे वाटते, या प्रश्नावर नेपो म्हणाला, ‘पांढऱया मोहऱयांनी खेळताना नेहमीच विजयासाठी प्रयत्न करणे साहजिक असते. पण, काही वेळा लढत अनिर्णीत राखणेही महत्त्वाचे ठरते. मॅग्नस काळय़ा मोहऱयांनी उत्तम खेळला, इतकेच याबाबत सांगता येईल’.