एल ऍण्ड टीकडे वर्ग करण्यात आलेल्या कामगारांची अडचण
प्रतिनिधी /बेळगाव
पाणीपुरवठा मंडळाकडे कंत्राट पद्धतीने काम करणाऱया कामगारांना एल ऍण्ड टीकडे वर्ग करण्यात आले. मात्र कामगारांना बसण्यासाठी कार्यालय नसल्याने पाणीपुरवठा मंडळाच्या कार्यालयात कामकाज सुरू आहे. पण त्या ठिकाणी काम करण्यास मंडळाच्या अधिकाऱयांकडून मज्जाव केला जात असल्याची तक्रार कामगार करीत आहेत. त्यामुळे कामकाज कसे करायचे, असा प्रश्न कामगारांना भेडसावत आहे.
24 तास पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी पाणीपुरवठा नियोजनाचा कारभार एल ऍण्ड टी कंपनीकडे सोपविण्यात आला आहे. तसेच पाणीपुरवठा मंडळाने 358 कामगार कंत्राट पद्धतीने घेतले होते. व्हॉल्वमॅन, बिल कलेक्टर तसेच कार्यालयीन कामाची जबाबदारी कंत्राटी कामगारांवर सोपविली होती. पण 24 तास पाणीपुरवठा योजनेचे काम एल ऍण्ड टी कंपनीला देण्यात आले आहे. चोवीस तास पाणी योजनेचे काम करताना पाणीपुरवठा नियोजनाच्या कामात अडथळा निर्माण होण्याची शक्मयता होती. त्यामुळे पाणीपुरवठा नियोजनाची जबाबदारीदेखील एल ऍण्ड टी कंपनीकडे सोपविली आहे. त्यामुळे कंत्राट पद्धतीने काम करणाऱया 358 कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे कामगारांनी एल ऍण्ड टी कंपनीच्या अधिकाऱयांना तसेच प्रशासनाला निवेदन देऊन कित्येक वर्षांपासून काम करीत असल्याने कंत्राटी कामगारांना कामावर घ्यावे, अशी विनंती केली होती. त्यामुळे पाणीपुरवठा मंडळाकडील 358 कामगारांना एल ऍण्ड टी कंपनीकडे वर्ग करण्याचा निर्णय घेऊन राज्य शासनाने तसा आदेश बजावला आहे.
त्यामुळे पाणीपुरवठा मंडळाने 354 कंत्राटी कामगारांना एल ऍण्ड टी कंपनीकडे वर्ग केले होते. पण चार कामगारांना वगळून 354 कामगारांना वर्ग केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सदर चार कामगार पाणीपुरवठा मंडळाच्या निवृत्त कर्मचाऱयांची मुले असल्याने त्यांना पाणीपुरवठा मंडळाच्या कार्यालयात ठेवून कायमस्वरुपी करण्याचा प्रयत्न काही अधिकाऱयांनी चालविला असल्याची चर्चा सुरू आहे.
एल ऍण्ड टी कंपनीकडे आवश्यक कार्यालय आणि इमारत नसल्याने सध्या महापालिकेच्या इमारतीत कामकाज सुरू आहे. सध्या त्या ठिकाणी सर्वांना बसण्यासाठी पुरेशी जागा नसल्यामुळे पाणीपुरवठा मंडळाच्या कार्यालयात बसून सदर कामगार काम करीत आहेत. पण पाणीपुरवठा मंडळाचे अधिकारी त्यांना येथे बसण्यास मज्जाव करीत असल्याची तक्रार आहे. कार्यालय सुरू करून कामकाज सुरळीत करण्याच्या दृष्टीने एल ऍण्ड टी कंपनीने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. पण कंत्राटी कामगारांना बसण्यास पाणीपुरवठा मंडळाचे अधिकारी मज्जाव करीत असल्याने काम करण्यात अडथळा निर्माण झाला आहे. याबाबत कामगारांनी एल ऍण्ड टी कंपनीच्या अधिकाऱयांकडे तक्रार केली आहे. सध्या पाणीपुरवठा नियोजनाचे कामकाज करण्यासाठी पाणीपुरवठा मंडळाचे अधिकारी सहकार्य करीत आहेत. त्यामुळे सध्या बसण्यासाठी मंडळाच्या कार्यालयाचा वापर केला जातो. तरीदेखील अधिकारी मज्जाव करीत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.









