प्रतिनिधी / पणजी :
देशहितासाठी आम्ही काम करत असून देशहिताचेच निर्णय आम्ही घेणार आहोत. कार्यकर्ता हा कार्यशील नसेल तर पक्षाचा विस्तार होणार नाही. गोवा भाजप मंडळात आता बदल झाले असून प्रत्येक प्रमुखांनी व कार्यकर्त्यांनी घरोघरी सातत्याने संपर्क साधला तरच पक्षाचा विस्तार होईल, असे मत भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश खन्ना यांनी व्यक्त केले.
पणजीतील गोमंतक मराठा समाज सभागृहात आयोजित केलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता संमेलनात ते उपस्थित प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते. यावळी गोवा व महाराष्ट्राचे संघटनमंत्री विजय पुराणिक, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, उपमुख्यमंत्री बाबू आजगांवकर, गोवा भाजप नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मावळते प्रदेशाध्यक्ष व खासदार विनय तेंडुलकर, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, मंत्री माविन गुदिन्हो, मायकल लोबो, दीपक पाऊसकर, आमदार दयानंद सोपटे, सुभाष फ्ढळदेसाई, सुभाष शिरोडकर, जोशुआ डिसोझा, उत्तर गोवा मंडळ अध्यक्ष महानंद असनोडकर, द क्षिण गोवा मंडळ अध्यक्ष तुळशिदास नाईक व इतर पदाधिकाऱयांची उपस्थिती होती.
विजय पुराणिक म्हणाले की, स्वामी विवेकानंद यांना योद्धा संन्यासी म्हटले जाते तर छ. शिवाजी महाराज यांना श्रीमान योगी असे विशेषण लावले जाते. हे दोन्ही आमचे आदर्श आहेत. न थांबता लढायचे आणि विजय मिळवायचे असे या वीरांनी आम्हाला शिकविले आहे. या दोन्ही वीरांची विचारधारा असणारा भाजप कार्यकर्ता आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ हे ब्रीदवाक्य घेऊन पंतप्रधान मोदी देशाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. भाजपचा एक सामान्य कार्यकर्ता कुठच्या कुठे पोहचू शकतो हे याचे उत्तम उदाहरण आहे. गेल्या निवडणुकित आमचे 13 आमदार निवडून आले होते. त्यानंतर 13 आमदारांहून 27 आमदारांचा प्रवास हे सर्व या पदाधिकाऱयांनी पाहिले आहे. आता जिल्हा पंचायतीच्या निवडणुका मार्चमध्ये होणार आहेत. त्याची तारीख 15 फ्sढब्रुवारीपर्यंत जाहीर होईल. आम्हा सर्व कार्यकर्त्यांना यासाठी प्रयत्न करायचे आहे असेही ते म्हणाले.
सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले की, गोवा भाजपचे विद्यमान संघटनमंत्री सतीश धोंड यांनी मला प्रथम संघ शाखेवर नेले आणि तेव्हापासून माझ्या या प्रवासाला सुरुवात झाली. पंच, सरपंच, मंडळ सरचिटणीस, सचिव व इतर अनेक पदे माझ्याकडे होती आणि आता भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. ही एक जबाबदारी असून आता कामही वाढले आहे. 2022 ही विधानसभा निवडणूक महत्त्वाची असून त्यात 30 आमदार निवडून आणण्याचे लक्ष्य आहे ते आम्हा सर्व कार्यकर्त्यांना साध्य करायचे आहे. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्याशिवाय ही प्रथमच निवडणूक आहे. त्यांचे आशीर्वाद आमच्यासोबत असून आम्ही त्यांचे कार्य पुढे नेले पाहिजे.









