ऑनलाईन टीम / पुणे :
कोरोनाच्या लढाईत सामान्य माणसांप्रमाणे राजकीय पक्षाचे आणि गणेशोत्सव मंडळाचे कायकर्ते देखील जगले पाहिजेत. प्रत्यक्ष काम करणा-या केवळ भाजपाच्या कार्यकर्त्यांनाच नाही, तर गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते, पोलीस, डॉक्टर्स, पत्रकारांना नगरसेवक हेमंत रासने यांनी जीवनावश्यक वस्तूंचे किट देऊन सन्मानित केले आहे. कार्यकर्ता हा देखील कोरोना वॉरिअर आहे. तो रस्त्यावर उतरुन गरजूंना किराणा, मास्क वाटतोय. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांनी स्वत: किंवा दानशूरांकडून रस्त्यावरील कार्यकर्त्यांचा आरोग्य विमा काढायला हवा, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
नगरसेवक व स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने मित्र परिवारतर्फे पुण्यातील 1 हजार गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकत्यांसह पोलीस, डॉक्टर्स, पत्रकार असे 3 हजार जणांना टप्याटप्याने जीवनावश्यक वस्तूंचे किट देऊन कार्यकर्ता सन्मान करण्यात आला.
चंद्रकांत पाटील म्हणाले, भारतीय जनता पार्टीने लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्यांना पुण्यामध्ये 8 दिवस पुरेल इतके 2 लाख 30 हजार किट दिले आहेत. यंदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व परिस्थिती लक्षात घेता गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा. ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर गणपती उत्सव चालतो, त्यांचे घर कसे चालेल हे आपण पहायला हवे, असेही त्यांनी सांगितले.









