पी. चिदंबरम यांची घोषणा : फोंडय़ातील कार्यकर्त्यांशी साधला संवाद
प्रतिनिधी /फोंडा
येणाऱया विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार कार्यकर्तेच ठरवतील. कार्यकर्त्यांकडून जी दोन किंवा तीन नावे पाठवली जातील, त्यापैकीच एका उमेदवाराची पक्षाकडून निवड केली जाईल. उमेदवार ठरविण्याचे पूर्ण स्वातंत्र्य कार्यकर्त्यांना दिलेले आहे. ज्यामुळे फुटरतेलाही आळा बसेल. मात्र उमेदवार निवडताना तो प्रामाणिक, कार्यकर्त्यांना न्याय देणारा व विजयाची खात्री असलेला असावा याची काळजी घ्या, असे आवाहन काँग्रेसचे वरिष्ठ नेते व गोव्यातील निवडणूक निरीक्षक पी. चिंदबरम यांनी केले.
आपल्या तीन दिवसांच्या गोवा दौऱयात चिदंबरम यांनी रविवारी दुपारी फोंडा मतदार संघातील काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला. काँग्रेस नेते राजेश वेरेकर यांनी येथील मॅनिनो ट्रेड सेंटरमध्ये हा कार्यकर्ता मेळावा घडवून आणला. यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडुराव, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन, कार्याध्यक्ष ऍलेक्स सिकेरा, उपाध्यक्ष एम. के. शेख, राजेश वेरेकर, फोंडा गटाध्यक्ष जॉन पेरेरा व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. चिदंबरम यांनी यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या सूचना ऐकून घेतल्या. उमेदवाराच्या प्रचारापासून त्याला निवडणून आणण्यापर्यंत सर्व जबाबदारी बुथ समित्यांनी उचलण्याचे आवाहनही त्यांनी केले.
गोव्याचे कोळसा हब होऊ देणार नाही
गोव्यातील सरकार कसे असावे, हे येथील स्थानिक नेतेच ठरवणार आहेत. पक्षाच्या वरिष्ठांकडून त्यात कुठलाच हस्तक्षेप केला जाणार नाही. त्यासंबंधी पूर्ण स्वतंत्र गोमंतकीयांना दिलेले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. गोव्याविषयी बोलताना जगभरात या राज्याची स्वतंत्र ओळख असल्याचे सांगून गोव्यातील धार्मिक सलोखा, बहुभाषिकत्त्व, बहुसंस्कृती टिकून राहिली पाहिजे. गोव्याचे निसर्गसौंदर्य अबाधीत राहावे यासाठी कोळसा हब होऊ देणार नाही. येथील पर्यावरणात बाधा आणणारे व लोकांचा विरोध असलेले तीनही प्रकल्प रद्द केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नोकऱया, पर्यावरणसंवर्धत, विकास व भ्रष्टाचारमुक्त शासन हे प्रमुख मुद्दे असतील. लवकरच हा जाहीरनामा प्रसिद्ध होणार असून त्यात आम्ही खोटी आश्वासने देणार नाहीत, असे ते म्हणाले. सन 2017 मध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेस पक्ष गोव्यात सरकार स्थापन करु शकले नाही, याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.
जनतेसमोर सत्य मांडा : दिनेश गुंडुराव
दिनेश गुंडुराव म्हणाले, भाजपाकडून द्वेशाचे व सुडबुद्धीचे राजकारण सुरु आहे. सरकारविरोधात बोलणाऱयांवर एकतर दंडेलशाही किंवा इडीच्या धाडी घातल्या जातात. इंधन दरवाढीवर सवलत देऊन आम जनतेला दिलासा देण्यापेक्षा मोदी सरकारने नफा कमावण्यात धन्यता मानली. सामान्य जनतेवर करांचा बोजा लादून मोजक्याच धनाडय़ांच्या तिजोऱया भरल्या. सध्या देशात बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. आर्थिक वाढ खुंटली असून भारतात गुंतवणूकदार येऊ पाहत नाहीत. भाजपा सरकार सर्वांत भ्रष्ट असून भ्रष्टाचाराच्या पैशातून खोटी जाहिरातबाजी व आमदार विकत घेऊन राज्यात सत्ता बळकावली जात आहे. काँग्रेस हा लोकशाहीवर धारणा असलेला पक्ष असून जनतेचे स्वतंत्र अभाधीत राखण्यासाठी गोव्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार सत्तेवर येणे गरजेचे आहे. भाजपाच्या राज्यात चाललेली फसवणूक, हुकुमशाही व महागाई या सर्व गोष्टी कार्यकर्त्यांनी जनतेसमोर मांडाव्यात. जनतेसमोर सत्य मांडण्याचे आवाहन त्यांनी केले.
काँग्रेसच्या काळातच गोमंतकीयांना अच्छे दिन
महागाई, बेरोजगारी, वाढते गुन्हे व दडपशाहीच्या या राज्यात भाजपा सरकारला गोमंतकीय जनता कंठाळाली असून काँग्रेसच सुशासन व जनतेचे सरकार देऊ शकेला असा गोमंतकीयाना ठाम विश्वास आहे, असे दिगंबर कामत म्हणाले. भाजपाचे सरकार हे खोटारडे असल्याचा आरोप गिरीश चोडणकर यांनी केला. जनतेच्या मतांची कदर व आदर करणाऱया काँग्रेस सरकारच्या कार्यकाळातच गोमंतकीयांनी खरे अच्छे दिन अनुभवले. सार्दिन यांनीही निव्वळ आश्वासने व खोटारडेपणचा कळस गाठलेल्या भाजपाला घरी पाठविण्याचे आवाहन केले. फोंडा मतदार संघाचा खरा विकास काँग्रेस कार्यकाळातच झाला. भाजपाच्या कार्यकाळात फोंडय़ावासियांनी विकास कमी व समस्याच अधिक अनुभवल्या, अशी टिका राजेश वेरेकर यांनी केली.









