ओटवणे / प्रतिनिधी-
कारीवडे भंडारीटेंब येथील भरवस्तीत शनिवारी रात्री अजगराच्या मुक्त संचारामुळे सर्वांचीच भितीने गाळण उडाली. अखेर सावंतवाडी येथील सर्पमित्र नविद हेरेकर आणि नबिला हेरेकर यांना घटनास्थळी पाचारण करून या अजगराला जेरबंद केल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
शनिवारी रात्री उशिरा श्री शेर्लेकर यांच्या घराजवळ हा दृष्टीस पडला. त्यानंतर या अजगराच्या मुक्त संचारामुळे सावंतवाडी येथील सर्पमित्र नविद हेरेकर, नबिला हेरेकर यांना संपर्क करण्यात आला. त्यांनी तात्काळ भंडारीटेंब येथे येत अजगराला सुखरूप रित्या पकडले आणि नैसर्गिक अधिवासात सोडले. हेरेकर यांनी गेल्या वर्षभरात ५२ नाग तसेच शंभराच्या वर अजगर पकडले आहेत. दरम्यान आपला जीव धोक्यात घालून रात्री अपरात्री सेवा करणाऱ्या सर्व सर्पमित्रांची शासनाने दखल घेऊन त्यांना विमाकवच देण्याची मागणी मंगेश तळवणेकर यानी केली आहे.









